Ahmednagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथे मोठ्या थाटामाटात भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते. खातेदारांना आकर्षक व्याजदर तसेच विविध योजनांच्या अमिष दाखवत मोठ्या ठेवी गोळा करण्यात यशस्वी ठरलेल्या भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाची लक्ष्मी अडकून पडली आहे. परिसरातील खातेदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी साकडे घातले आहे.
अमिष दाखवत मोठ्या प्रमाणात ठेवी
तालुक्यातील मोठे गाव अन मोठी बाजारपेठ असल्याने येथे भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटची शाखा मोठा गाजावाजा करत उघडण्यात आली. पंचक्रोशीतील व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, महिला यांना विविध योजनांचे अमिष दाखवत मोठ्या प्रमाणात ठेवी देखील गोळा करण्यात आल्या. जेऊर परिसरात असलेल्या लहान मोठ्या गावांमधून अनेक खातेदारांनी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये पैसे गुंतवले. यातील बहुतांशी खातेदार शेतकरी, दुग्ध व्यवसायीक तसेच शेतीत मोलमजुरी करणाऱ्या महिला असल्याची माहिती समोर येत आहे.
अनेक गोरगरिबांचे पैसे अडकले
काहींनी मुलींच्या विवाहासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी तर काहींनी आपल्या संपूर्ण आयुष्यभराची पुंजी भाग्यलक्ष्मी मध्ये गुंतवलेली आहे. ठेवेदारांनी पैसे मिळण्यासाठी अनेक हेलपाटे मारून देखील पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. याबाबत ठेवीदारांनी नुकतीच जेऊर गावातील संतुकनाथ मठात बैठक घेतली. यावेळी अनेक गोरगरिबांचे पैसे अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पैसे मागावे कोणाकडे ?
फसवणूक झालेल्यांचा आकडा कोट्यावधी रुपयांच्यावर असल्याची बाबही समजली. जेऊर शाखेला सुमारे दोन महिन्यांपासून कुलूप लावून कर्मचारी देखील फरार झाले आहेत. त्यामुळे पैसे मागावे कोणाकडे असा प्रश्न खातेदारांसमोर पडला आहे. याबाबत जेऊर येथील ठेवीदारांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले असून गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी साकडे घालण्यात आले आहे.
शाखेला कुलूप लावून सर्वच गायब
निवेदनामध्ये भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे चेअरमन, संचालक, शाखा व्यवस्थापक, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत तक्रार करण्यात आली आहे. जेऊर येथील शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन विविध आमिष दाखवत, भूलथापा मारत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या. सदर पैसे देण्यास सहा महिन्यांपासून टाळाटाळ करण्यात येत आहे. शाखेला कुलूप लावून सर्वच गायब झाले आहेत. मोबाईलही बंद केल्याने फसवणूक झाल्याचे ठेवेदारांच्या लक्षात आले. तरी सदर रकमेच्या अपहार प्रकरणी चौकशी करून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कर्डिले यांनी घातले लक्ष !
ठेवेदारांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यासमोर फसवणूक झाल्याची कैफियत मांडली. यावेळी कर्डिले यांनी या प्रकरणात लक्ष घालून सर्व गोरगरिबांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कर्डिले यांनी ठेवेदारांना दिल्याची माहिती रोहिदास जाधव यांनी दिली.