अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने भाजपच्या इतर नेत्यांचंही टेन्शन वाढलं आहे.
काल सायंकाळी विखे पाटील यांनी भाजपच्या राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांसोबत लग्न समारंभासह विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती.
काल बुधवारी नगरमध्ये विखे पाटलांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती.
आज माझी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मी पुढील काही दिवस कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहणार नाही . त्याबद्दल क्षमा असावी.
तसेच माझ्या संपर्कातील सर्वांनी टेस्ट करून घ्या आणि काळजी घ्या असे त्यांनी ट्वीट विखेंनी केले आहे.
भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाचा काल विवाह सोहळा होता.
त्यासाठी मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. करोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत मोठ्या गर्दीसह हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर आज सकाळी विखे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.
सामान्यांना विवाह समारंभासह अन्य कार्यक्रमांवरही निर्बंध घातले जात आहेत. तर दुसरीकडे काही नेते मंडळींचे शाही विवाह सोहळे सुरूच आहेत.
याबद्दल नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यातून कोरोनाचा विस्फोट झाला अन परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे.