Ahmednagar News : मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे त्या भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत.
दरम्यान याच पावसाने आपल्या शेतातील पिके कशी आहेत याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा जोरदार धक्का बसून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे.
शिवदास शंकर कणसे असे त्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.याबाबत सविस्तर असे, मागील आठवड्यापासून शेवगाव तालुक्यातील दिवटे आणि परिसरामध्ये सुरु असलेला संततधार पाऊस काल सायंकाळच्या दरम्यान काहीसा बंद झाल्याने शेतातील पिकांची परिस्थिती पाहण्यासाठी कणसे हा शेतकरी सायंकाळी ६ च्या दरम्यान गावालगत असलेल्या विद्युत रोहित्रापासून जात होता.
परंतु ओलसर जमिनीमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोरात विजेचा शॉक बसला. या दरम्यान सोबत असलेल्या मित्राचे डिपीच्या पोलवर स्पार्किंग झाल्याचे लक्षात आल्याने त्याने तात्काळ बोधेगाव सबस्टेशनला फोन करून माहिती दिली.
नंतर त्या भागातील वीज पुरवठा बंद करून कणसे यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन वर्षाची मुलगी आई-वडिल आणि भाऊ असा मोठा परिवार आहे.