अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- प्रवरा नदीवरील जुन्या छोट्या पुलावरून मोटारसायकवरून जाणार्या दोघा युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले.
काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे यातील एकजण बचावला असून दुसरा मात्र वाहून गेला. शरद कोल्हे असे वाहून गेलेल्याचे नाव आहे. सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे.
भंंडारदरा धरण ९८ टक्के तर निळवंडे धरण ८६ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात काल, परवा झालेल्या जोरदार पावसाने निळवंडेत जोरदार पाण्याची आवक झाली.
त्यामुळे धरणातून १२ हजार ९४५ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे. तालुक्यातील कोकणेवाडी, निंब्रळ, इंदोरी, अगस्ती पुलांवरून पाणी वाहत आहे.
संगमनेर शहरालगतच्या प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरून पाणी वेगाने वाहत होते. तालुक्यातील कोळवाडी येथील शरद धोंडीबा कोल्हे व सुनील चांगदेव आहेर हे आपल्या प्लॅटिना मोटरसायकलवरून पुलावरून जात होते.
मात्र त्यांना पुलावरील पाण्याचा अंदाज आला नाही. पुलाच्या मध्यभागीच त्यांची गाडी बंद पडली. नदीच्या पुलावर पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने ते मोटरसायकलसह पाण्यात बुडाले.
यातील सुनील आहेर याने नदीच्या काठावर असलेल्या एका झाडाच्या फांदीचा आधार घेतला. तो पुरात बुडत असल्याचे पाहून उपस्थित नागरिकांनी मोठ्या धाडसाने त्याला बाहेर काढले. शरद कोल्हे मात्र वाहून गेला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved