Ahmednagar News : अहमदनगर महापालिका कामगार युनियनच्या वतीने विविध प्रलंबित मागण्या संदर्भात नगर ते मुंबई मंत्रालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या पायी लॉन्ग मार्चबाबत तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी बोलवलेल्या बैठकीत महापालिका कामगार युनियनचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादंग झाले.
अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप करत युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून बाहेर पडत निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पदाधिकारी पुन्हा बैठकीत सहभागी झाले. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही तोडगांना निघाल्याने सदरची बैठक निष्पळ ठरली.
महापालिका कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आयुक्त पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांनी गुरुवारी (दि. २१) कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती.
यावेळी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंदराव वायकर, बाबासाहेब मुद्गल, बलराज गायकवाड, गुलाब गाडे, सतीश ताठे, महादेव कोतकर, नंदू नेमाने यांच्यासह अनेक पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बैठक सुरू झाल्यावर महापालिकेच्या बाराशे कर्मचाऱ्यांना काढण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीस तात्काळ रद्द करण्याची मागणी युनियन पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यामुळे त्या नोटीस रद्द होणार नाहीत अशी भूमिका आयुक्तांनी घेतली.
यावर पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन अधिकारी हे कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून बैठक सोडून बाहेर आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या आवारात त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करत घोषणाबाजी केली.
काही वेळात पदाधिकाऱ्यांना पुन्हा बैठकीत बोलवण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात प्रशासन सकारात्मक असून त्यामुळे पायी लॉन्ग मार्च काढू नये असे आवाहन आयुक्तांनी केले.
मात्र महापालिका स्तरावरील मागण्यात तात्काळ मान्य कराव्यात अशी भूमिका युनियनने घेतली. यावेळी झालेल्या वादात बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे बैठक निष्पळ ठरली.