अहमदनगर बातम्या

भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला, धरणाची पातळी ८० टक्क्यावर !

उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरण ८० टक्के भरले असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात कोसळत असलेला पाऊस काही प्रमाणात ओसरला असल्याचे दिसून येत आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मागील आठवड्यापासून अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळत आहे. बुधवारी या भागाला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपून काढल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गुरुवारी दुपारनंतर भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील पाऊस काही प्रमाणात ओसरला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील जनजीवन सुरळीत झाल्याचे दिसत आहे.

गेल्या आठवड्यापासून कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भंडारदरा धरण ८० टक्केच्या पुढे सरकले आहे. घाटघर, रतनवाडी, साम्रद या परिसरात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत असल्याचे समजते.

बुधवारी झालेल्या प्रचंड पावसाने आदिवासी बांधवांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून महसूल विभागाकडे पंचनामे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जोरदार वाऱ्यामुळे उडदावणे येथे चंदर सोमा गांगड या व्यक्तीच्या घराचे कौले उडून गेल्याचे समोर आले.

त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. परिसरातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांची भातशेती अद्यापही पाण्याखाली आहे.
मागील २४ तासांमध्ये भंडारदरा येथे ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या घाटघरला १७० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

रतनवाडी १४९ मिलिमीटर तर पांजरे येथे १४५ मिलिमीटर पाऊस पडला. सतत पाण्याची वाढ होत असल्यामुळे भंडारदरा धरण ८०.८३ टक्के भरले असून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८९२३ दशलक्ष घनफूट झाला आहे.

११०३९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेले भंडारदरा धरण १०५०० दशलक्ष घनफूट होताच पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रवरा नदीत विसर्ग सुरू होऊ शकतो. कृष्णावंती नदी, वाकी धरणावरून १५७४ क्युसेसने वाहत असल्याने निळवंडे धरणाचा पाणीसाठा ४० टक्के झाला आहे.

जर पावसाचा वेग असाच सुरू राहिला तर भंडारदरा धरण जुलै महिना अखेर पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आदिवासी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये आनंदच वातावरण आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts