Ahmednagar News : पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे ओढवलेले संकट आणि डोक्यावर वाढत असलेला कर्जाचा डोंगर. यामुळे आलेल्या नैराश्यातून एका तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नगर तालुक्यातील पारगाव मौला गावच्या शिवारात घडली.
ज्ञानेश्वर कोंडीबा कांबळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, मयत कांबळे हे गावच्या शिवारात शेतातील वस्तीवर राहतात. सायंकाळी त्यांनी घराच्या पाठीमागे शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेतला.
ही बाब त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे घोषित केले. मयत कांबळे यांच्या पश्चात वडील, पत्नी, १ मुलगा,१ मुलगी, ३ भाऊ असा परिवार आहे. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.