Shirdi News : शिर्डी पोलीस हद्दीत एका बंगल्यात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा टाकून पोलिसांनी दोन परप्रांतीय पीडित मुलींची सुटका केली.
याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शिर्डी येथील पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, शिर्डी येथे नगर-मनमाड रोडच्या बाजुला एका बंगल्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे, अशी खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पथकातील व्यक्तीस या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकला. यावेळी दोन पीडीत परप्रांतीय मुलींची तेथून सुटका करण्यात आली, तसेच एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
स्पा सेंटर चालक फरार झाला आहे. आरोपीविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे शिर्डी परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, हेड कॉन्स्टेबल इरफान शेख,
पोलीस नाईक अशोक शिंदे, पोलीस नाईक बाबा खेडकर, महिला पोलीस नाईक वंदना वाकचौरे, पोलीस नाईक श्याम जाधव, पोलीस नाईक दिनेश कांबळे, चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे.
शिर्डीत कोणत्याही अवैध व्यावसायिकाची गय केली जाणार नाही. नागरिकांनी निर्भीडपणे फोन करून अशा घटनेची गुप्त माहिती द्यावी. आम्ही तात्काळ कडक कारवाई करू, असे आवाहन मिटके यांनी नागरिकांना केले आहे. शिर्डीतील त्यांच्या धडक कारवाईचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.