अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील महामार्ग बनलेत अपघाताचे केंद्र, वर्षभरात ७७९ मृत्यू, नेमकं काय घडतंय? पहा स्पेशल रिपोर्ट

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध महामार्गांचे जाळे पसरले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असले तरी हे महामार्ग विविध कारणांमुळे मृत्यूचे केंद्र बनले आहेत.

या एकाच वर्षात अहमदनगर जिल्ह्यात विविध भागांत झालेल्या अपघातात ७७९ मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

नाशिक पुणे, मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रीय महामार्गावर यातील सर्वाधिक अपघात झाले आहेत. ऊसतोड हंगाम सुरु असल्याने होणारी विचित्र वाहतूक याने देखील यात भर पडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून मनमाड, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, नाशिक-पुणे, सोलापूर आदी राष्ट्रीय महामार्ग आहेत. अनेक रस्त्याचे कामे सुरु आहेत. शहरातील उड्डाणपूल उभा राहिल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटला. परंतु असे असले तरी अपघाताचे प्रमाण चिंताजनकच आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य आणि इतर रस्त्यांवर एकूण ५६ अपघात प्रवणक्षेत्र आहेत.

या अपघात प्रवणक्षेत्रात उपाययोजना करण्यात येतात. अशा भागात वाहन सावकाश चालवा, पुढे पूल आहे, असे फलकही लावलेले असतात, मात्र, याकडे दुर्लक्ष करीत अनेकजण सुसाट वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अपघात घडताना दिसतात.

अपघाताचे प्रमाण, आकडेवारीत..

जिल्ह्यात वर्षभरात ७१३ प्राणांतिक अपघात झाले आहेत. अपघातात तब्बल ६५५ गंभीर जखमी झाले आहेत. ८९९ इतर प्रकारचे अपघात झाले आहेत. ११२८ इतकी जखमींची संख्या आहे. या अपघातांमध्ये ७७९ लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

अपघातांची कारणे

महामार्गाच्या मध्यभागी दुभाजक आहेत. या बहुतांश रस्त्यांच्या दुभाजकाच्या बाजूने असलेले पांढरे पट्टे पुसले गेले असल्याने दुभाजक लक्षात येत नाहीत. त्यामुळे वाहने दुभाजकावर आढळून अपघात होतात.

जिल्ह्यातील विविध रस्त्यावर ५६ अपघात प्रवणक्षेत्र आहेत. इतर रस्त्यांवरील ठिकठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत. परंतु वाहनचालक याकडे दुर्लक्ष करत वाहने चालवतात.

रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहनांचे लाइट्स डोळ्यांवर येतात. नवीन वाहनांमध्ये एलईडी लाइट असून हे लाइट अत्यंत प्रस्वर असल्याने अक्षरश: डोळ्यांना अंधाऱ्या येत असून रात्रीच्या वेळी अपघात होण्याचे है महत्त्वाचे कारण आहे.

काही लोकांनी आपल्या फायद्यासाठी महामार्गावरील दुभाजक वाट्टेल तिथे फोडलेले आहेत. विशेष करून हॉटेल्स, दुकाने, विविध व्यावसायिक दुकानांसमोरच हे प्रकार आढळून येत आहेत. त्यामुळे अशा तोडलेल्या दुभाजकामुळे रस्ता ओलंडताना होणाऱ्या अपघातांचीही संख्या वाढली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office