अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- राज्यात सध्या पाच हजार 200 पोलिसांची भरती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लेखी परिक्षा, मैदानी चाचणी झाली असून अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
दुसर्या टप्प्यात राज्यात सात हजार 200 पोलिसांच्या भरती संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असून येत्या काही दिवसांमध्ये या भरती प्रक्रियेला सुरूवात केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
गृहमंत्री वळसे पाटील शुक्रवारी अहमदनगर दौर्यावर होते. सायंकाळी त्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-टपाल प्रणालीचे उद्धघाटन व वृक्षारोपन करण्यात आले. त्यांनी जिल्हा पोलिसांची आढावा बैठक घेतली.
यावेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर मंत्री वळसे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, राहुरी, पाथर्डी पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला जिल्ह्यातील पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील पोलिसांनी सर्वसामान्यांना न्याय कसा मिळेल हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन काम करावे,
सायबर गुन्ह्यांचे प्रमाणात वाढ झाली असून याकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना जिल्हा पोलिसांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिसांनी सुरू केलेली ई-टपाल प्रमाणीचे काम चांगले असून भविष्यात राज्यातही हा प्रयोग राबविण्याचे त्यांनी सांगितले.