नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी शिवारात झाडाला स्विफ्ट कार आदळल्याने नारायणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई महेश तुकाराम काठमोरे यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. स्विफ्ट कारचा चालक साहील करीम हुसेन खान व गणेश सचिन शिंदे (दोघे रा. तिसगाव, ता. पाथर्डी) गंभीर जखमी आहेत.
पोलीस कॉन्स्टेबल महेश काठमोरे पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील रहिवासी आहेत. जखमींना नगर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळतात स्थानिकांच्या मदतीने पारनेरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व सहाय्यक फौजदार संदीप गायकवाड यांनी जखमींना उपचारासाठी हलवले.
अधिक माहिती अशी
नगर-कल्याण रस्त्यावरील हॉटेल समर्थ नाष्टा सेंटरसमोर स्वीफ्ट गाडी नंबर (एमएच १४ जीएस ४२२०) चालक साहील करीम हुसेन खान याने भरधाव चालविल्याने झाडावर आदळली. चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश तुकाराम काठमोरे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले, की माझा लहान भाऊ महेश तुकाराम काठमोरे पोलिस दलात नोकरीस आहे. १९ डिसेंबरला सुट्टीवर आला होता.
२० डिसेंबरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास परत डयुटीवर जाण्यासाठी मित्र साहील करीम हुसेन खान व गणेश सचिन शिंदे यांच्यासह गावातील वाहीद शेख् यांची स्वीफ्ट कार घेऊऩ नारायणगाव येथे निघाले. २१ डिसेंबरला मध्यराजी १२.०४ च्या सुमारास माझे दाजी अशोक जगन्नाथ तागड (रा. सोनई ता. नेवासा) यांनी फोन करुन सांगितले की, महेश यांचा अपघात झाला असून तो मयत झाला आहे.
मी, माझी पत्नी व माझा चुलत भाऊ अशोक साहेबराव काठमोरे असे आम्ही खासगी वाहनाने टाकळी ढोकेश्वर येथे जात असताना साहील करीम हुसेन खान व गणेश सचिन शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे अपघाताबाबत विचारपूस केली. महेश काठमोरे पुढील सीटवर होता. हा अपघात चालक साहील खान याच्या चुकीमुळे झाल्याचे गणेश तुकाराम काठमोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.