Ahmednagar News : नगर जिल्ह्यात दूध भेसळ करण्याचे प्रमाण वाढत असून अशा भेसळखोरांवर पोलिस यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. दुध भेसळ जर कोणी करत असेल तर थेट पोलिस अधिक्षक तसेच मला माहिती द्या. या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी. जी.शेखर पाटील यांनी दिला आहे.
गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी शुक्रवारी (दि.८) पोलिस अधीक्षक कार्यालयात नगर जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
डॉ. शेखर पाटील पुढे म्हणाले की, नगर जिल्ह्यात ३ हजार ३४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नगर शहरात २०४ कॅमेरे बसविले असून त्याच्या कंट्रोल रुममध्ये बसून संवेदनशील भागावर लक्ष ठेवले जात आहे.
जिल्ह्यात सन २०२२ मध्ये २५ गावठी कट्टे पकडण्यात आले होते. यावर्षी आगस्टपर्यंत २२ कट्टे पकडले आहेत. ज्याने कट्टा पुरवला त्याला सहआरोपी करण्यात आले आहे. विषारी दारु, हातभट्टी विरोधात धडक मोहीम राबविली जात आहे
जिल्ह्यात वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जात आहे. एकूण १२७ पैकी २२ टोळ्यांवर कारवाई झाली आहे. ३ टोळ्यांवर कारवाईचे काम सुरु आहे तर ८९ प्रस्ताव प्रलंबित आहेत, तेही लवकरच मार्गी लागतील.
पूर्वी सुरु असलेल्या पोलिस चौक्या बंद पडलेल्या आहेत. त्या सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून चौक्या सुरु होऊन त्यात कर्मचारीही उपस्थित राहणार आहेत. यावर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी ईद ए मिलादची मिरवणूक आलेली होती. मात्र मुस्लिम बांधवांनी ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाज बांधवांचे आभार मानले.
तसेच सर्व सण उत्सव नागरिकांनी शांततेत पार पडत या सण उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून जातीय तणाव वाढविण्याचा प्रयत्न काही समाज कंटकांकडून सुरु आहे. त्यावर पोलिस यंत्रणेने लक्ष केंद्रित केले असून सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल प्रकरणी ५१ गुन्हे दाखल झालेले असून ७८ आरोपींना अटक केली आहे.
संगमनेर येथे ४९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यात पोस्ट टाकणाऱ्यांसोबतच त्या पोस्टला लाईक, कमेंट्स करणाऱ्यांचाही समावेश आहे. याशिवाय सायबर गुन्हे नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे ते म्हणाले.