अहमदनगर बातम्या

दुधातील भेसळ बंद झाल्यास दूधाला ५० रुपयांपर्यंत भाव मिळेल – शेतकरी नेते सुरेशराव लांबे

गेल्या आठवड्यात दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी राहुरीत झालेले रास्ता रोको आंदोलन व भाषणबाजी हा निव्वळ राजकीय स्टंट असून, जखम डोक्याला व मलम गुडघ्याला असा प्रकार पाहायला मिळत आहे.

दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी ओरडणारे राजकीय नेते व कार्यकर्ते हे दूध भेसळीबाबत काहीच बोलत नाहीत, अशी टिका करीत दूधातील भेसळ थांबल्यास दूधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळेल, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शेतमालाच्या भावाबाबत आंदोलन करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे कुठलेही देणेघेणे नाही. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हा फक्त शेतकऱ्यांच्या मतासाठी राजकिय स्टंट आहे.

सध्या कांद्याला ३ हजारापर्यंत भाव आहे. सत्ता पक्षाने चालु अधिवेशनात दूधाचे भाव व अनुदान जाहीर करुन नविन योजना जाहीर केल्या तरी आंदोलन केले जात आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी वर्ग कोरोना व अतिवृष्टी या कारणाने आर्थिक अडचणीत असताना ऊर्जा राज्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची शेतीपंपाची चालु लाईट बंद करुन थकबाकीच्या नावाखाली सक्तीची विजबील वसुली करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नौटंकी आंदोलन करुन स्टंटबाजी करुन शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये, असा आरोप शेतकरी नेते सुरेशराव लांबे यांनी केला.

दूधात भेसळ करून निष्पाप नागरिकांसह लहान लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आणले जात असताना यात खरा दूध उत्पादक बदनाम झाला. त्यामुळे दूध भेसळखोरांवर सरकारने, अन्न व औषध भेसळ विभागाने कठोर कारवाई करावी.

त्यामुळे दूध अतिरीक्त होणार नाही. खऱ्या दूध उत्पादकाला ५० रुपयांपर्यंत भाव मिळेल व आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन लांबे यांनी केले आहे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts