Ahmednagar News : खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वजनात लुटण्यासोबतच बाजार समितीचा सेस व शासनाचा महसूल बुडविणाऱ्या व्यापारी विरोधात कारवाईची मोहीम कोपरगाव बाजार समितीकडून हाती घेण्यात आलेली आहे.
खेडा खरेदी व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी व सोयाबीन या शेतीमालास योग्य भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीच्या आवारातच विक्रीस आणावा, असे आवाहन कोपरगाव बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
याबाबत पत्रकात बाजार समितीच्या वतीने म्हटले, की यावर्षी तालुक्यात यावर्षी कमी पावसामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन, मका या पिकाची मोठी हानी झाली आहे. सोयाबीन, मका या पिकाची काढणी सुरु असल्याने मजुरांना देण्यासाठी व रब्बी पिके उभे करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे.
शेतकऱ्यांच्या या अडचणींचा फायदा घेऊन बाजार समितीऐवजी खेडा खरेदीच्या माध्यमातून व्यापारी सोयाबीनची उचल करीत आहेत. त्यामुळे बाजार समितीचा व शासनाचा महसूल बुडत असल्याने बाजार समिती व्यवस्थापनाने याविरोधात कारवाईचा निर्णय घेतला.
त्या अंतर्गत कोणताही परवाना नसताना बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सोयाबीनची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याकडून खेडा खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यतादेखील अधिक राहते.
अवैधपणे शेतकरी बांधवांच्या घरी जाऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाला जादा भाव देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन आर्द्रता मशिनमध्ये हातचलाखी करुन वाळलेली सोयाबीन,
मका यांची आर्द्रता जास्त व प्रतवारी कमी असल्याचे भासवुन शेतकऱ्यांची फसवणुक करत आहेत, असे बाजार समितीच्या निदर्शनास येत असुन बाजार समितीने अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करणेकरीता बाजार समितीने पथक नियुक्त केले आहे.
शेतकरी बांधवांनी शेतमाल विकत असतांना व्यापाऱ्यांकडुन हिशोब पट्टीची प्रत घ्यावी, त्यामुळे भविष्यात शासनाकडून अनुदान योजनेचा फायदा घेता येईल, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कृपया बाजार समितीचे परवानाधारक सोयाबीन खरेदीदार यांनाच आपला शेतमाल विक्री करून बाजार समितीस सहकार्य करावे. जेणेकरून कोणत्याही शेतकरी बांधवाची फसवणूक होणार नाही. – साहेबराव रोहोम, सभापती
बाजार समितीमध्ये उघड लिलावाच्या बोलीने सर्व धान्याचे लिलाव होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला उंच भाव मिळतात. बाजार समितीमध्ये हमाली व तोलाई वगळता शेतकऱ्यांच्या कटा पट्टी कुठलीही कपात केली जात नाही. या व्यतीरीक्त त्यांना पैशाची हमी आहे. -गोवर्धन परजणे, उपसभापती