Ahmednagar Politics : बाप्पू हयात असताना त्यांनी सर्व नेत्यांना मदत केली. परंतु आम्हाला कोणी मदत करत नाही. काही झालं तरी अनुराधा नागवडे यांना निवडणुकीत उतरवणार व कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा लढवणारच असे प्रतिपादन नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.
श्रीगोंदा शहरातील छत्रपती महाविद्यालयात पत्रकार दिनाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. नागवडे यावेळी म्हणाले, महाविद्यालयामध्ये बापूंनी कशाप्रकारे उभारणी केली हे आपण पहात आहात, उद्याच्या काळामध्ये या संस्थेचे नाव कसे मोठे होईल यासाठी आम्ही अहोरात्र काम करत आहोत असेही ते म्हणाले. आम्ही सहकारी कारखाना चालवत असून शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कधीच पैसे थकवले नाहीत.
सहकार टिकला तर शेतकरी टिकेल असेल ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकार भवनासाठी जागा मिळवून देऊ असे आश्वासन दिले. तालुक्यासाठी पत्रकार भवनासाठी जागेचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता. मात्र आतापर्यंत माझ्याकडे कोणी मागणी केली नव्हती. पण पत्रकार भवनासाठी जागा मिळवून देणारच असे नागवडे म्हणाले.
स्वर्गीय बापूंच्या जयंतीनिमित्त १९ तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी प्रशांत दरेकर, सुरेश रसाळ, भाऊसाहेब नेटके, श्रीनिवास घाडगे, दत्तात्रय काकडे, शरद खोमणे, संदीप औटी, सुभाष शिंदे, बंडूतात्या जगताप, वसंतराव वाळुंज, पत्रकार बांधव उपस्थित होते.
बबनराव पाचपुतेंना तिकीट नाही ?
स्वर्गीय बापूंच्या जयंतीनिमित्त १९ तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीगोंदेत येणार आहेत. सध्या विधानसभेला अजित पवार गटाकडून नागवडेंकडून तिकीट देण्यासाठी नाहाटा प्रयत्नशील आहेत. ते सध्या नागवडे व अजित पवार यांचे सूत जुळवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
याशिवाय या विधानसभेला श्रीगोंद्याची जागा अजित पवार गटाला सोडावी व त्याबदल्यात अकोल्याची जागा भाजपला सोडावी असे काही ठरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आ.बबनराव पाचपुते यांना तिकीट मिळणार नाही का? अशी चर्चा सुरु झाली आहे.