शिर्डी येथील साईबाबा सुपर व साईनाथ हॉस्पिटलमध्ये आठवड्यात एक दिवस कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असले, तरी कॅन्सर आजाराची तीव्रता ज्या प्रमाणात आहे. त्यासाठी केमोथेरपी करायची असेल तर, यासाठी दोन्ही हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत नसल्याने या मोफत आरोग्य सेवेचा लाभ रुग्णांना मिळत नाही.
त्यासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर व बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याने ही सेवा त्वरित सुरू करण्यासाठी साईबाबा संस्थानच्या त्रिस्तरीय समितीने तात्काळ पुढाकार घेऊन हा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांमधुन केली जात आहे.
शासनाने उदात्त हेतू ठेवून विविध वैद्यकीय सुविधा रुग्णांसाठी शासकीय योजनेत बसवून मोफत केलेले आहेत, असे असताना साईबाबा हॉस्पिटल मध्ये का केमोथेरपी सुविधा नाही, हा मोठा प्रश्न आहे.
साई शताब्दी काळात दीडशे कोटी रुपये खर्चाच्या १०० बेड हॉस्पिटल, मनुष्यबळ व तज्ज्ञ डॉक्टरांच्या संदर्भात मागणी प्रस्ताव साईबाबा संस्थान पाठवलेला होता, अशी चर्चा असली तरी जवळपास अनेक वर्ष उलटून देखील काहीच
हालचाल नसल्याने याचा फटका ग्रामीण व शहरी व अतिदुर्गम भागातून शिर्डी येथील दवाखान्यात वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रुग्णांना बसत आहे. त्यामुळे आर्थिक
खर्चाबरोबरच मानसिक त्रास देखील सहन करावा लागत आहे.
याबाबत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना विचारले असता, याबाबत काय अडचणी आहेत, याची माहिती घेतो, असे सांगितले. तसेच साईनाथ सुपर हॉस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी डॉ. प्रीतम वडगावे यांना विचारले असता,
केमोथेरपीसाठी हॉस्पिटलचा शासकीय योजनेत समावेश नसून त्यासाठी शताब्दी काळात प्रस्ताव पाठवलेला आहे, असे सांगत त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व मनुष्यबळ व १०० बेडची गरज असून त्यासाठी साईबाबा संस्थानने १५० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव देखील काही वर्षांपूर्वी पाठवलेला आहे, असे सांगितले.
त्यामुळे साईबाबा संस्थाने या हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्याची मोठी गरज असल्याची भावना रुग्णांमधून व्यक्त होत आहे.
शासनाकडे पाठपुरावा करणार : डॉ. पिपाडा
महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर नावलौकीक असलेल्या साईबाबा संस्थानच्या दवाखान्यात केमोथेरपी मोफत होत नाही. तज्ज्ञ डॉक्टर व मनुष्यबळाचा अभाव व पुरेसे बेड नसणे हि वेदना देणारी बाब आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेऊन तातडीने प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून रुग्णांची अडचण दूर करु, अशी माहिती भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी दिली.