Ahmednagar News : राज्यात येऊ घातलेल्या भाजपच्या नव्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री असणारा यासंबंधी आता उत्सुकता निर्माण झाली आहे. संभाव्य नेत्यांची नावेही पुढे येत आहेत.
मात्र, यापैकी नेमकी कोणाची वर्णी लागणार हे लवकरच स्पष्ट होईल. नगर जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात केवळ राधाकृष्ण विखे पाटील हे एकटचे मंत्री होऊ शकतात, असे सांगितले जाऊ लागले आहे.
गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देण्यात येणार असल्याने नगरमधून विधान परिषदेवर नव्याने निवडून आलेले राम शिंदे यांचा पहिल्या टप्प्यात समावेश होऊ शकणार नाही, असेही आता सांगण्यात येऊ लागले आहे.
विखे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही सोपविले जाऊ शकतो. एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजपचे अन्य नेते यांना सामावून घेतल्यानंतर गरज पडल्यास पुढील टप्प्यात उरलेल्यांना संधी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जिल्ह्यात तीन मंत्री होते. त्यामुळे भाजपचेही तीन मंत्री असावेत, अशी मागणी करून विखे पाटील, शिंदे आणि मोनिका राजळे यांची नावे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पुढे करण्यात आली आहेत.
यावेळी मंत्रिपदाचे वाटप करताना शिंदे गटाला यथायोग्य स्थान देणे, तसेच पुढील निवडणुकीचे गणित डोळेसमोर ठेवून निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे नेहमीच्या ठोकताळ्यांपेक्षा यावेळी वेगळे निकष लावले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.