Ahmednagar News : कलाकेंद्रांचा विषय नेहमीच चर्चेत असतो. जामखेड येथील कलाकेंद्रही वारंवार चर्चेत असतात. परंतु आता कलाकेंद्रांसंदर्भात मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.
हे कलाकेंद्र सांस्कृतिक कलेच्या नावाखाली सरासर डान्सबार बनल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
कलाकेंद्रातील डीजे साऊंड सिस्टीमवर बंदी घातली पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेने केली आहे. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना याबाबत निवेदन दिले आहे.
यावेळी लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर या स्वतः उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत आरपीआयचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, लक्ष्मण ढेपे, संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे आदींसह अनेक कलाकार आलेले होते.
जामखेडमध्ये नऊ कलाकेंद्र असून ते सांस्कृतिक कलेच्या नावाखाली डान्सबार बनल्याचे यात म्हटलेआहे. तसेच याठिकाणी असणाऱ्या डीजे सिस्टीमने कलाकारांना काम मिळत नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
सुनील साळवे (जिल्हाध्यक्ष, आरपीआय आठवले) यांनी यावेळी म्हटले आहे की, डीजेचे अतिक्रमण झाल्याने कलाकेंद्रातील कलावंतांना काम मिळेनासे झाल्याने कलावंतांची उपासमारी सुरु आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने कलाकेंद्राच्या नावाखाली सुरु झालेले डान्सबार बंद करण्यासाठी रोखठोक व प्रसंगी कठोरही भूमिका घेणे गरजेचे आहे.