अहमदनगर बातम्या

आगामी निवडणुकीत ‘त्यांचा’ हिशेब चुकता करू ! भाजप नेत्याचे मोनिका राजळेंना आव्हान

पक्षाच्या जबाबदार कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्यावर साधा फोन करण्याचे सौजन्य मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी यांनी दाखवले नाही, त्यांना पक्षाचे कार्यकर्ते डोईजड झालेत काय ?

ज्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी यांना निवडून आणले, त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आगामी निवडणुकीत त्यांचा हिशेब करू, त्यांचं काय करायचे हे जनताच ठरवेल, अशा शब्दांत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

शेवगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना खोटा गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून निलंबित करावे तसेच त्यांच्या मालमत्तेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, आपल्यावर पिंगेवाडी येथील वाळू प्रकरणी अरुण मुंडे व उदय मुंडे यांच्याविरुध्द दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा

तसेच हा गुन्हा दाखल करावा, यासाठी खोटा जबाब देणाऱ्या पिंगेवाडीच्या सरपंच व त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शेवगाव व पाथर्डी तालुक्‍यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने सोमवारी (दि.४) शेवगाव शहरातील क्रांती चौकात दुपारी २ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

श्री.मुंडे म्हणाले- पो.नि.पुजारी यांच्या कार्यपद्धतीविरुध्द आपण वरिष्ठ अधिकारी, पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी करीत होतो, त्याचा राग मनात ठेऊन त्यांनी माझ्याविरुध्द खोटा गुन्हा दाखल केला. लोकप्रतिनिधी यांची संमती असल्याशिवाय त्यांनी हे धाडस करणे शक्य नाही.

गोकुळ दौंड म्हणाले- शेवगाव दंगल काळात व आता मुंडे बंधू विरुध्द खोटे गुन्हे दाखल करणारे सूत्रधार कोण आहेत, हे तपासावे. प्रशासकीय यंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर चालतात, हे ओळखून या राजकीय शक्तींना आगामी काळात दूर ठेवा.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राकिसन चव्हाण, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, युवा मोर्चाचे गुरुनाथ माळवदे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन सुनील काकडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आत्माराम कुंडकर, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब सोनवणे,

वंचितचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, पैठणचे शिवसेना तालुकाप्रमुख अरुण काळे, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, घोटणचे माजी सरपंच संजय टाकळकर, विलास फाटके, भाऊ वाघमारे, गणेश कराड यांची भाषणे झाली. आंदोलनात अमोल सागडे,

माजी नगरसेवक अजय भारस्कर, कमलेश गांधी, रिपाइंचे तालुकाध्यक्ष सतीश मगर, दिगंबर काथवटे, ठाकूर पिंपळगावचे सरपंच संजय खेडकर, अंबादास ढाकणे, सालार शेख, रिजवान शेख,

नितीन फुंदे, अनिल वडागळे, राजेंद्र नाईक, अर्जुन ढाकणे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.पो. नि.दिगंबर भदाणे यांनी कार्यवाही करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यांनतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office