Ahmednagar News : यात्रेत रहाड करण्यासाठी खड्डा खोदला जातो. त्यात बोरीचे लाकूड पेटवून त्याचा विस्तव केला जातो. त्या विस्तवावरून नवस बोललेले अनेक भाविक उघड्या पायाने चालून नवस फेडतात. त्यासाठी भाविकांची मोठी रीघ असते.
ज्यावेळी भाविक विस्तवावरून चालतात त्यावेळी मंदिरातील मूर्तीला घाम फुटतो, हे या रहाड यात्रेचे वैशिष्ट्य आहे. मागील अनेक वर्षांपासून हि परंपरा चालत आलेली आहे.
आपल्याकडे काही परंपरा वर्षानुवर्षांपासून जपल्या जातात. मात्र काही प्रथा आजच्या विज्ञानयुगात सुरु आहेत. यातील अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे रहाड यात्रा हि देखील याला अपवाद नाही.
या यात्रेत पेटत्या विस्तवावरून अनवानी पायाने चालण्याची परंपरा आहे. गटारी अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी हनुमानाचं मंदिर सापडले होते . त्या निमित्तानं दरवर्षी याच दिवशी ही यात्रा भरते.
त्यानुसार पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे समर्थ हनुमान मंदिर येथे शुक्रवारी रहाड यात्रा उत्साहात झाली. समर्थ हनुमान महाराज की जय, बजरंग बली की जय घोषणा देत हजारो भाविकांनी लालबुंद विस्तवाची वाट चालली. लालबुंद विस्तवाची अनवाणी वाट चालून नवसपूर्ती केली.
देवस्थानचे अध्यक्ष रमेशआप्पा महाराज यांच्या उपस्थितीत दुपारी साडेतीन वाजता रहाडाची अग्निपूजा झाली. सव्वादोन तासांनंतर लालबुंद विस्तव तयार झाला. त्यानंतर मानकरी मारुती लोखंडे यांनी अग्निकुंडाला श्रीफळ वाढवत पहिल्यांदा विस्तवाची वाट चालले.
या वेळी धार्मिक मंत्रोच्चार, जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. रात्री नऊ वाजेपर्यंत रहाड खेळण्याचा जल्लोष सुरू होता. श्रावण मासाच्या पूर्वसंध्येला आषाढ वद्य पंचमीचा मुहूर्त साधत हजारो भाविकांनी समर्थ रामदास स्वामी स्थापित गोमयीन हनुमान मूर्तीच्या दर्शनाचा लाभ घेतला. सन २००९मध्ये या मंदिराच्या जीर्णोद्धारास सुरुवात झाली. राजस्थानी दगडाने मंदिर उभारण्यात आले असून, मंदिराचा कायापालट झाला आहे.