Ahmednagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथे टवाळखोरांची दहशत वाढली असून टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. जेऊर हे तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते.
येथे बारावीपर्यंत शिक्षण सुविधा उपलब्ध असून, परिसरातील बहिरवाडी, इमामपूर, डोंगरगण, धनगरवाडी, ससेवाडी, पांढरी पूल, मजले चिंचोली तसेच वाड्या वस्त्यांवरुन विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात.टवाळखोरांच्या उपद्रवामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
चौका चौकात, दुकान परिसरात टवाळखोर व रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला आहे. विद्यालय भरताना तसेच सुटण्याच्या वेळेस धूमस्टाईल वाहन चालवणे, अश्लील हावभाव करणे, मुलींचा पाठलाग करणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत.
रोडरोमिओंच्या दहशतीमुळे कोणी तक्रार करण्यासही धजावत नाही. शाळेच्या सुट्टीदरम्यान परिसरातील दुकाने, चौक, रस्ते टवाळखोरांच्या घोळक्यांनी व्यापलेले असतात. रोडरोमिओंबाबत यापूर्वी संबंधित विद्यालय व्यवस्थापन, ग्रामपंचायत तसेच नागरिकांनी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर काही काळासाठी बंद झालेल्या रोडरोमियोंनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. यापूर्वी शिक्षकांना दमबाजी, आपापसांत हाणामाऱ्या देखील झालेल्या आहेत. मागील महिन्यात एका अल्पवयीन मुलीला चॉपरचा धाक दाखवून तिची छेड काढण्याच्या प्रकाराची चांगलीच चर्चा गावामध्ये झाली;
परंतु तक्रार नसल्याने कारवाई करताना पोलिसांसमोरेखील मर्यादा येताना दिसून येतात. शालेय विद्यार्थीदेखील चॉपर, फायटर स्वतःजवळ बाळगत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मुंजोबा चौकात शालेय विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादात चॉपर तसेच फायटर सारख्या धोकादायक हत्यारांचा वापर करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. असे प्रकार आपसात मिटून घेतले जात असले तरी हत्यारे बाळगण्याची क्रेझ धोकादायक आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.