अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राहाता नगरपरिषदेने शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमण तात्काळ काढून रस्त्याचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेचे प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांच्याकडे केली आहे.
अतिक्रमण करणार्याना अनेकदा रस्त्यावरून जाणार्या-येणार्या नागरिकांनी समज देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यावर कुठलाही परिणाम होत नसून अनेकदा समज देणार्या नागरिक व अतिक्रमणधारक यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होण्याच्या घटना झाल्या आहेत.
यामुळे नागरिकांनी प्रशासनाला यासाठी साकडे घातले आहे. दरम्यान राहाता शहरात कोपरगाव नाका ते हुतात्मा चौक शनि मंदिर परिसर, गवती मार्ग व इतर मुख्य रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.
रस्त्यालगत बांधलेली जनावरे, बांधकामासाठी आणलेली वाळू ,खडी, विटा अशी विविध प्रकारची अतिक्रमणे रस्त्यावर केल्याने चार चाकी तसेच दुचाकी वाहनांना या अतिक्रमणामुळे मोठी कसरत करून मार्ग काढावा लागतो.
तर पर्यायी मार्ग म्हणून आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी कोपरगाव नाका ते ग्रामीण रुग्णालय हा मुख्य बाह्यवळण रस्ता करण्यात आला.
परंतु शहरात 24 लाख रुपये खर्चाची भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असल्याने या मुख्य बाह्यवळण रस्त्याची एक बाजू पूर्णतः बंद आहे. सर्वच रस्त्यांच्या मध्यभागी भूमिगत गटार खोदायचे काम झाल्याने सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहे.
परिणामी शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ सर्वच रस्त्यांची शासकीय मोजणी करून रस्त्याच्या कडेला असलेले
अतिक्रमण काढून शहराचा श्वास मोकळा करावा तसेच भूमिगत गटार योजनेसाठी खोदलेले रस्त्यांचे डांबरीकरण करून नागरिकांसाठी रस्ता अद्ययावत करून द्यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने केली जात आहे.