Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील जवळके. धोंडेवाडी वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादराबाद, शहापूर आदी ग्रामपंचायत हद्दीत असलेले पाझर तलाव भरण्याबाबत नुकतीच जवळके, धोंडेवाडी येथील हनुमान मंदिरात परिसरातील निळवंडे कालवा कृती समितीचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थांची नुकतीच बैठक पार पडली.
तसेच या संबंधित पाणी सोडण्याच्या ठिकाणाची जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करण्यात आली आहे.उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा डावा कालवा १० टक्के तर उजवा कालवा २५ टक्के व वितरण व्यवस्था १०० टक्के अपूर्ण आहे.
उजव्या कालव्याचे राहुरी तालुक्यात भूसंपादन अद्याप बाकी आहे. एकुणात हा प्रकल्प अद्याप जवळपास ३५ टक्के अपूर्ण असून सुद्धा या ५३ वर्ष प्रलंबित प्रकल्पाचे कामाचे लोकार्पण करण्याचा प्रस्थापित नेत्यांनी आगामी निवडणुका पाहून षडयंत्र आखले असून त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने त्याचे पडसाद दुष्काळी भागात तीव्र स्वरूपात उमटले आहे.
या पार्श्वभूमीवर दुष्काळी भागात तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटले आहे. रांजणगाव देशमुख येथेही काही नागरिकांनी उपोषण करून त्याकडे लक्ष वेधून घेतले होते. त्यात जलसंपदा विभागाने पाझर तलाव भरण्याचे आश्वासन दिले आहे.
तथापि अद्याप त्याबाबत शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच बैठक प्रांताधिकारी माणिक आहेर, जलसंपदा विभागाचे उपअभियंता महेश गायकवाड, संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस अधिकारी सोपान शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊनही कार्यवाही सुरु झालेली नाही.
दरम्यान, याबाबत शिर्डी येथील बैठकीत पाणी सोडण्याबाबत बैठकीच्या अंतिम चरणात चर्चा झाली आहे. मात्र धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापूर आदी ठिकाणच्या तलावात पाणी कसे सोडायचे याबाबत अंतिम कार्यवाहीचे स्वरूप निश्चित झालेले नाही. या पार्श्वभूमीवर हि बैठक आयोजित केली होती.
दरम्यान, धोंडेवाडी येथील हनुमान मंदिरात निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, कार्याध्यक्ष मच्छिद्र दिघे, गंगाधर रहाणे, सचिव कैलास गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, तानाजी शिंदे, बाळासाहेब सोनवणे, यशवंत गव्हाणे, बहादराबादचे माजी सरपंच विक्रम पाचोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
त्यावेळी जेष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद गाढे, भिवराज शिंदे, विजय शिंदे, किसन पाडेकर, माजी उपसरपंच विजय थोरात, माजी सरपंच वसंत थोरात, माणिक दिघे, ज्ञानदेव नेहे, रावसाहेब मासाळ, दगडू रहाणे, उपसरपंच रामनाथ पाडेकर, सोपान थोरात, रंगनाथ गव्हाणे, सोपान रहाणे, अनिल खालकर, वाल्मिक नेहे, नानासाहेब नेहे, अॅड. आर.सी. गव्हाणे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
प्रारंभी गंगाधर रहाणे यांनी प्रास्तविक केले. सदर बैठकीनंतर जलसंपदा विभागाचे अभियंता साबळे यांच्यासह निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते, विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व शेतकरी आदींनी धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापूर, अंजनापूर, बहादराबाद, सायाळे, मलढोण आदी गावातील पाझर तलावात संभावित पाणी सोडण्याची ठिकाणांची पाहणी केली आहे. मात्र यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची गैरहजेरी होती.