Ahmednagar News : ऊसतोडणी कामगार व वंचितांसाठी आपले आयुष्य वेचण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केल्याने पाथर्डी तालुक्यात आलो की त्यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. स्व. बबनराव ढाकणे यांनी तालुक्यात वीज आणण्यासाठी विधानसभेत पत्रके फेकली अन् काळाच्या ओघात ते देशाचे ऊर्जामंत्री झाले, हा प्रवास प्रेरणादायी आहे.
तुमच्या मनात प्रताप ढाकणे हे आमदार व्हावे, अशी इच्छा असून, ती पूर्ण होणार आहे. सध्या केवळ झेंड्याची भाषा वापरली जात असून, पोटातील भुकेला जात व धर्म नसतो, हे त्यांना कळेनासे झाले आहे. परिवर्तनाची लढाई लढावी लागेल, त्यासाठी युवकांनी तयार रहावे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात सुरू केलेल्या युवा संपर्क अभियानाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी बोलताना कोल्हे म्हणाले की, दिल्लीत ढोलकी वाजली की, माना हलवणारे नंदी निवडून देण्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी लढणारे वाघासारखे लोकप्रतिनिधी निवडून द्या. आपली अर्थव्यवस्था ही पाचव्या स्थानावर असल्याचे सांगितले जाते. देशातील नव्वद टक्के संपत्ती ही दहा टक्के लोकांच्या हातात आहे.
शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा करा, अशी मागणी आम्ही केली तर सुळे व माझ्यावर निलंबनाची कारवाई केली. अंधभक्तांच्या टोळीपासून आता आपल्याला वाचवायचे असल्याने नवमतदारांनी विचारपूर्वक मतदान करायला हवे. टाटा, एअरबस, वेदांत, सारखे राज्यातील प्रकल्प गुजरातला नेण्यात आले. या विषयावर सत्ताधारी खासदार बोलत नाहीत.
कोट्यवधी रुपयांचे रस्ते, पूल, रामदिर उभारले, याचा आम्हालाही अभिमान आहे. माणूससुद्धा जगला पाहिजे, याचा विचार सरकार करत नसून जाती -धर्माच्या नावाखाली जनतेला वेडयात काढण्याचे काम यांनी सुरू केले आहे. विरोधात कोणी बोलले तर ईडी व सीडीचा वापर केला जातोय. मात्र, या सर्वाविरुद्ध ८३ वर्षांचे तरुण नेते शरद पवार लढत आहेत.
जे लढतात त्यांचाच इतिहास लिहिला जात असल्याने तरुणांनी लढण्याचे काम करावे. संघर्षयोद्धा बाबनरावजी ढाकणे व केदारेश्वरचे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी स्वागत केले. गणेश सरोदे व अपर्णा शेळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार माधव काटे यांनी मानले.
कोणी डंका वाजवा अथवा कोणी झेंडा रोवा, मी मैदानात उभा आहे. आता कोणीही येवु द्या मी दंड थोपटून तयार आहे. आता कुस्ती करावीच लागेल व जिंकावी लागेल, असा टोला व राजळे व घुले यांचे नाव न घेता अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी लगावला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी व युवक उद्ध्वस्त झाला आहे.
शेतीमालाला भाव नाही, हाताला रोजगार नाही, शेतीला पाणी नाही. कर्जाच्या ओझ्याखाली माणसं दबली आहेत. समाजमन व समाज भावना समजून घेणारा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. आजची जी अराजकता आहे, त्याला शासन व्यवस्था जबाबदार आहे. मी रडणारा कार्यकर्ता व नेता नाही, मला लढण्याचा व संर्घषाचा वारसा मिळालेला आहे. मी लढेल व जिंकेल, असा विश्वास प्रतापराव ढाकणे यांनी व्यक्त केला.