अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- बांधकाम व्यावसायिक आदित्य चोपडांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिल्या.
दरम्यान या प्रकरणाच्या तपासात फारशी प्रगती झाली नसली तरी आदित्यची हत्या झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत. फर्यादी संदीप चोपडा यांचा पुरवणी जबाब नोंदवून आदित्यच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे समजते. मात्र पोलिसांकडून त्याला दुजोरा मिळाला नाही. पोलिसांनी या प्रकरणी कमालीची गुप्तता पाळली आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज नारायण गव्हाण येथील घटनास्थळास भेट दिली. तपासासंदर्भात सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री आज (शुक्रवार) शिरूर नगर परिषदेच्या इमारतीच्या लोकार्पणासाठी आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी चोपडा कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
त्यावेळी त्यांनी नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चोपडा मृत्यूप्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर चोपडा कुटुंबांना न्याय मिळेल असे पहावे अश्या सूचना त्यांनी केल्या. कार्यक्रमादरम्यान जैन समाजाच्या वतीने पवार यांना निवेदन देण्यात आले होते.
व्यावसायिक स्पर्धेतून आदित्यची हत्या झाल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, चोपडा कुटुंबियांना न्याय मिळेल. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले.त्याबरोबर अपप्रवृत्ती वाढल्या.
अशा अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलीस प्रशासनाचे आहे.वाळू तस्करीसह इतर अवैध व्यवसायांवर पोलिसांनी कारवाया कराव्यात अन्यथा पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी पवार यांनी दिली.