Ahmednagar News : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली असून याबाबत विधी मंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नुकतीच बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विविध विषयावर चर्चा झाली. सभेप्रसंगी संचालकांना आगाऊ रक्कम देण्यात आल्याचे तसेच पेट्रोल पंपावरून लाखो रुपयांचे पेट्रोल दिले गेल्याचे यासह इतर आरोप झाले.
मागील काळात बाजार समितीच्या संचालकांना लाखो रुपयांची आगाऊ रकम देण्यात आल्याचे तसेच पेट्रोल पंपावरून लाखो रुपयांचे पेट्रोल, डिझेल दिल्याचा आरोप करून यास संचालक मंडळाची परवानगी नसेल,
तर याप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या आरोपात तथ्य असल्यास हा प्रकार गंभीर स्वरुपाचा आहे. या आरोपांची चौकशी करावी, आपण याबाबत सविस्तर कागदपत्रांसह माहिती मागवून विधीमंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आ. कानडे यांनी म्हटले आहे.