Ahmednagar News : के. के. रेंजसाठी आरक्षित झालेली 1 शेतकऱ्यांची एक गुंठाही जमीन जाऊ देणार नाही. लवकरच या शेतकऱ्यांना आपल्या जमिनी परत मिळून देऊ, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहुरी नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानांतर्गत मंजूर झालेल्या १३४ कोटी ९८ लाखांपैकी ९२ कोटी ९८ लाख रुपयांच्या सुरू होणाऱ्या भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्याचे भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले होते. यावेळी खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी चेअरमन व ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष पाटील, कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले, की भ्रष्टाचारमुक्त शासन देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनसुरू आहे. सरकारबरोबरच सामान्य माणसांपर्यंत योजना पोहोचाव्यात, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे.
आम्ही विकासाच्या कामांमध्ये कधी मागे राहणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्नदेखील सोडवण्यासाठी हे सरकार आग्रही आहे. के. के. रेंजचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार डॉ. विखे पाटील यांनी सांगितले, की गेल्या ५० वर्षात राहुरीचा विकास झाला नाही, तो आम्ही करून दाखवू. ११ हेक्टर जमीन राहुरीकरांसाठी देऊन या जमिनीवर प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन, शासकीय दवाखाना, त्याचबरोबर पाच एकर जागा ज्यांना घर बांधण्यासाठी जमीन नाही, अशा प्रत्येक कुटुंबाला अधां गुंठा जमीन देण्यासाठी आरक्षित केली जाणार आहे. आता विकास काय असतो, हे आम्ही राहुरीच्या जनतेला दाखवून देऊ, असे त्यांनी सांगितले.
कडिले म्हणाले की, आम्ही केलेल्या भूमिपूजनानंतर त्यांनी श्रेय घेण्यासाठी भूमिपूजने सुरू केली; मात्र जनता वेडी नाही. आपले नाकर्तेपण झाकण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
सुभाष पाटील यांनी राहुरीतून मंत्री विखे यांची मिरवणूक निघते हा नेहमी शुभ संकेत राहिलेला असून नामदार विखे हे संधीचे सोने करणारे असून तालुक्याच्या विकासामध्ये त्यांच्यामुळे मोठी भर पडणार असल्याचे सांगितले.