Ahilyanagar News:- राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये प्राजक्त तनपुरे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यामध्ये लढत होत असून दोन्ही उमेदवार या निमित्ताने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आपल्याला दिसून येत आहेत.
प्राजक्त तनपुरे यांचा जर प्रचार बघितला तर यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतल्याचे चित्र असून अनेक घटकांकडून त्यांना या निवडणुकीत पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. केलेल्या विकास कामांच्या आधारे ते निवडणुकीला सामोरे जात असल्याचे चित्र आहे.
तसेच त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये गाव भेटींवर खूप मोठ्या प्रमाणावर जोर दिला असून मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिल्याचे सध्या दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून तनपुरे यांनी मंगळवारी डिग्रस, मुळा डॅम तसेच वरवंडी,
धामोरी खुर्द आणि धामोरी बुद्रुक, खडांबे खुर्द आणि खडांबे बुद्रुक इत्यादी गावांमध्ये प्रचार दौरा आयोजित केलेला होता. या प्रचार दौऱ्या दरम्यान वरवंडी येथील दौऱ्यात बोलताना त्यांनी शिवाजी कर्डिले यांच्यावर टीका केली.
कर्डिलेंनी जिल्हा बँक अडचणीत आणली- प्राजक्त तनपुरे यांची टीका
सहकार क्षेत्र डबघाईला आणणाऱ्या शिवाजी कर्डिले यांनी दुसऱ्यांवर सहकार्याबाबत आरोप करण्यापेक्षा आज जिल्हा बँकेची काय अवस्था झाली आहे ते पहावे. विनाकारण आरोप करू नयेत असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
काल त्यांनी मतदारसंघातील विविध गावांमध्ये प्रचार दौरा आयोजित केलेला होता व यावेळी वरवडे येथील दौऱ्या दरम्यान त्यांनी शिवाजी कर्डिले त्यांच्यावर विविध मुद्द्यांवर टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, जिल्हा बँकेचा सीडी रेशो बिघडला आहे. तसेच कर्ज वाटप मध्ये अनियमितता असल्याची चर्चा आहे.
बहुतेक सोसायटीमध्ये त्यांची कर्ज फेडण्याची पात्रता नाही अशा लोकांना मोघम कर्ज वाटप केले असून या प्रकारच्या तक्रारी अनेक सेवा संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांनी सुमारे 1000 कोटी रुपयांच्या ठेवी काढल्याची चर्चा आहे. जिल्हा बँकेचे वाताहात झाल्याचा आरोप देखील यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी केला.