MLA Kashinath Date Political Journey:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने घवघवीत असे यश संपादन केले व राज्याच्या सत्ता पटलावर परत विराजमान होण्याचा महायुतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरली व यामध्ये अनेक अनपेक्षित असे निकाल देखील लागले.
या दृष्टिकोनातून आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी महायुतीचाच वरचष्मा असल्याचे पाहायला मिळाले. तब्बल बारा विधानसभा मतदारसंघांमधून दहा विधानसभा मतदारसंघावर महायुतीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले व यामध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघ हा देखील अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
पारनेर विधानसभा मतदार संघामधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आणि महायुतीचे उमेदवार म्हणून काशिनाथ दाते यांच्यामध्ये सरळ लढत झाली. या लढतीमध्ये काशिनाथ दाते यांनी राणी लंके यांचा 1526 मतांनी पराभव करत विधानसभेत पोहोचण्याची किमया साध्य केली. काशिनाथ दाते हे जिल्हा परिषदेचे माजी कृषी व बांधकाम समितीचे सभापती होते व जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालय ते विधानसभेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास त्यांनी पूर्ण केला.
दाते यांचा टायपिस्ट ते आमदार होण्यापर्यंतचा रोमहर्षक व प्रेरणादायी राजकीय प्रवास
आमदार काशिनाथ दाते यांचा जर आपण राजकीय प्रवास बघितला तर तो गेल्या 40 वर्षापासून आहे. परंतु अगदी सुरुवात जर बघितली तर 45 वर्षांपूर्वी ते कन्हेर सारख्या एका छोट्या गावातून पारनेर या ठिकाणी आले व सुरुवातीला टायपिंग इन्स्टिट्यूटच्या व्यवसायामध्ये उतरले व या व्यवसायाच्या माध्यमातूनच त्यांनी अगोदर समाजकारणाला सुरुवात केली.
परंतु राजकारणाची आवड असल्यामुळे व्यवसाय सांभाळून त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप या पक्षांच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असे काम केले. इतकेच नाहीतर पारनेर विधानसभा मतदारसंघातील चार ते पाच आमदारांना त्यांनी साथ देखील दिली.
मध्यंतरीच्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी पारनेर तालुक्याच्या समाजकारण व राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले व आजतागायत ते काम त्यांनी सुरू ठेवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी दिवंगत बाबासाहेब ठुबे, वसंतराव झावरे, गुलाबराव शेळके यांच्यापासून ते आतापर्यंत माजी आमदार नंदकुमार झावरे, माजी आमदार विजय औटी यांच्याबरोबर देखील काम केले आहे.
तसेच राजकीय काम करत असताना जिल्हा परिषदेपासून तर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जिल्हा फेडरेशन, जिल्हा सहकारी बँक, पतसंस्था चळवळ तसेच पंचायत समिती यांच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय राहिले.
जेव्हा ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे सभापती म्हणून विकास कामांकरिता तालुक्याला जास्तीत जास्त निधी देऊन न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
या सगळ्या राजकीय कारकीर्दीत महायुतीची उमेदवारी त्यांना यावेळी मिळाली. विशेष म्हणजे सगळ्याच पक्षांशी असलेले मित्रत्व व जिव्हाळ्याचे संबंध त्यांना या निवडणुकीत फायद्याचे ठरले. अशा पद्धतीने काशिनाथ दाते यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सातत्य ठेवत आज एक टायपिस्ट ते आमदार होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला.