अहमदनगर जिल्ह्याचे कासपठार, भंडारदऱ्याचा घाटमाथा रानफुलांनी बहरला !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे कासपठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदऱ्याच्या घाटमाथ्यावर निसर्गाने कात टाकली आहे. हिरवळरूपी शालीवर रानफुले राज्य करु लागली आहे. त्यामुळे हा फुलोत्सव बघण्यासाठी पर्यटकांची पावलं झुकू लागले आहेत.

अकोले तालुक्यातील भंडारदऱ्याच्या घाटमाथ्याला सह्याद्रीची डोंगररांग असून नुकताच या घाटमाथ्यावरील वर्षांउत्सोव संपल्यात जमा झाला आहे. चार महिने सह्याद्रीच्या या डोंगररांगेवर राज्य केले. त्यामुळे डोंगररांगानी कात टाकली असून सर्वत्र हिरवळरूपी शाल पांघरल्याचे दृश्य प्राप्त झाले. याच हिरवळीच्या शालुवर निरनिराळ्या प्रकारचे रानफुले व गवतफुले राज्य करु लागली आहेत.

महाराष्ट्राचे एवरेस्ट समजल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखरावर सोनकळीची फुले डोलत असून डोंगरला सोन्याचा मुलामा चढविल्याचा भास होत आहे. तर रत्नाईचा रतनगडावरही सोनकळ्या डोलत आहे.

पाबरगडावर मोठी समजली जाणारी कारवी यावर्षी फुलली असल्याने पाबरगड निळाशार झाला आहे. एकुणच हा सह्याद्रीच्या डोंगररांगेतील करिष्मा बघण्यासाठी पर्यटकांची रिघ भंडारदऱ्याकडे सुरु झाली आहे.

भंडारदऱ्याचं पर्यटन अनुभवतानाच परिसरातील जंगालात रानभेंडी, कारवी, टोपली कारवी, तेरडा, कळलावी, सोनकी, घडहाण, दिवटा, धोटा, बाफळी, आंबु, पलदा, अशा विविध जातीच्या फुलांनी आपला साज चढविण्यास सुरुवात केली आहे.

यातील अनेक फुले हे आयुर्वेदिक औषधासाठी उपयोगी पडत आहेत. बाफळी फुलांना याच महिण्यात बहर येत असून कोरोनाच्या कालावधीत या फुलांच्या रसाने आदिवासी बांधवांनी कोरोनावर मात केली आहे.

कारवी टोपली या रानफुलांनी हिवाळा, एडक्याची धार तसेच विश्राम पेठेचं जंगल भरगच्च भरल्याचं दिसत असून आदिवासी बांधवांच्या पशुधनाचं हे प्रमुख खाद्य समजलं जातं. अलंग-कुलंग व मलंग गडालाहीही कारवी टोपली व सोनकीच्या फुलांनी गराडा घातल्याचे दिसून येत असून यातील सोनकीच्या फुलांचा वापर नवरात्रीतील घटाला माळीसाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे.

■ हिरव्यागार गवतात शेकडोच्या संख्येने डोकावणारी लाल, पिवळी, गुलाबी, निळ्या, जांभळ्या, पांढऱ्या रंगाची बहरलेली ही फुले आणि त्या फुलांवर मुक्तपणे बागडणारे फुलपाखरांचे थवे व लहान-मोठे चतुर पक्षी लक्ष वेधून घेत आहेत.

तर कारवीच्या फुलांचा पांढरा शुभ्र रंग मधमाशांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असल्याने यावर्षी मधमाशांच्या पोळांना उधान येण्याचे संकेत उडदावण्याच्या सखाराम गांगड या आदिवासी तरुणांने दिले आहे. जंगलातील पानं, फुलं यांच्यावर अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी भंडारदऱ्याचं हे कास पठार नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe