Kopargaon News : अवर्षणग्रस्त कोपरगाव मतदार संघात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली असून गोदावरी कालव्यांना सुरु असलेल्या बिगर सिंचनाच्या आवर्तनातून खरीप पिकांना तातडीने सिंचनासाठी पाणी द्यावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
आ. काळे यांनी नुकतीच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून सविस्तर चर्चा केली. यावेळी मतदार संघातील खरीप हंगामाची पिके वाचविण्यासाठी तातडीने गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना सुरु असलेल्या बिगर सिंचनाच्या आवर्तना बरोबरच सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी मागणी केली.
कोपरगाव मतदार संघ अवर्षणग्रस्त असून यावर्षी तुटपुंज्या पावसावर असंख्य शेतकऱ्यांनी खरीप हंगामात बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, तूर आदी खरीप पिकांची पुढील काळात पाऊस पडेल, या भरवशावर पेरणी केली. मात्र पावसाने कोपरगाव मतदार संघाकडे पूर्णतः पाठ फिरविल्यामुळे खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे.
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून हि खरीप पिके वाचवायची असेल, तर खरीप पिकांसाठी सुरु असलेल्या बिगर सिंचनाच्या आवर्तना बरोबरच सिंचनासाठी पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे.
धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा आहे. पाटबंधारे विभागाकडून १५ ऑगस्ट पर्यंत लाभधारक शेतकऱ्यांकडून ७ नंबर पाणी मागणी अर्ज मागविण्यात आलेले असले, तरी तत्पूर्वी खरीप पिकांना जीवदान देण्यासाठी सुरु असलेल्या आवर्तनातून सिंचनासाठी पाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने सिंचनासाठी पाणी द्यावे, अशी मागणी आ. काळे यांनी केली.