अहमदनगर बातम्या

Kopargaon News : कोपरगावात नवीन क्रीडा विद्यापीठ उभारण्याची कोल्हे यांची मागणी

Kopargaon News :  शिक्षणाच माहेरघर तसेच दळणवळणाच्या सर्व सुविधांनी परिपूर्ण असे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोपरगाव मतदार संघ परिसरात क्रीडा विद्यापीठ उभारण्याची मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्य सरकार व क्रीडा मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघात शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्री साईबाबा देवस्थान, मुंबई ते नागपूर हा समृध्दी महामार्ग, होऊ घातलेला सुरत- हैदराबाद महामार्ग, शिर्डी-मुंबई महामार्ग, काकडी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोपरगाव रेल्वेस्थानक व अद्ययावत बसस्थानक दळणवळणाची असल्यामुळे अतिशय उत्तम सुविधा आहे. तसेच विभागीय, राज्य, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर विविध खेळांमध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावून मोठे यश संपादन केलेले अनेक गुणवान खेळाडू आहेत.

खेळात करिअर करण्याच्यादृष्टीने क्रीडा सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या सुविधांमुळे खेळास अधिक चालनाही मिळेल, या विद्यापीठात ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा असतील. खेळाडूंसाठी आधुनिक प्रशिक्षणाबरोबरच शिक्षणही दिले जाणार आहे. क्रीडा विद्यापीठामुळे राज्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच खेळाशी संबंधित विविध व्यवसायांना प्रोत्साहन मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल आशियायी स्पर्धा व अन्य क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या देशाला अधिका- अधिक चांगले खेळाडू मिळावेत, यासाठी अनुकूल वातावरण व भौतिक सोयी- सुविधा आमच्या कोपरगाव मतदारसंघात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारल्यास ग्रामीण भागातील खेळाडूंना बॅचलर इन स्पोर्टस, सायन्स, बॅचलर इन स्पोर्टस मॅनेजमेंट, मास्टर इन स्पोर्टस, सायन्स, मास्टर इन स्पोर्टस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांची संधी मिळेल.

क्रीडा विद्यापीठामुळे राज्यासह ग्रामीण भागातील खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच खेळाशी संबंधित विविध व्यवसायांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नामदार अजित पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts