Ahmednagar News : कोयता गँगची पुण्यात चांगलीच दहशत होती. परंतु याचे लोन नगरमध्येही पसरल्याचे दिसते. नगरमध्येही कोयता गँगने हातात कोयते घेत शहरात दहशत करण्याचा प्रयत्न केला.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सावेडी उपनगरात गॅंग कोयता घेऊन फिरत होती. तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्वरित कारवाई करत त्या गॅंगला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कोयते व दुचाकी असा २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अमोल गोपीनाथ गायकवाड (वय २६ रा. गऊखेल ता. आष्टी जि. बीड, हल्ली रा. तपोवन रस्ता, सावेडी), रोहीत रमेश औटे (वय २० रा. पिंपरखेड ता. आष्टी जि. बीड, हल्ली रा. पोखर्डी ता. नगर), विकास सदाशिव दिवटे (रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, सावेडी) अशी गँगमधील पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी सपकाळ चौक, हॉटेल मातोश्री समोर ही कारवाई केली.
अधिक माहिती अशी : पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, संदीप धामणे, सतीष भवर, बाळासाहेब भापसे यांचे पथक तोफखाना हद्दीत मकरसंक्रांतीच्या अनुषंगाने गस्त घालत होते.
सपकाळ चौकात काही इसम दारूच्या नशेत संशयीतरित्या शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने सदर चौकात जाऊन पाहणी केली असता त्यांना तीन इसम संशयीतरित्या फिरताना मिळून आले. पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन कोयते मिळून आले.
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत कोयते, दुचाकी जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी वेळीच पायबंद घातल्याने अशा वृत्तींना वेळीच पायबंद बसेल यात शंका नाही. पोलिसांनी केलेल्या करवाईचे नागरिकांतून कौतुक होत आहे.