Ahilyanagar News:- सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून या हंगामातील जे काही कांदा किंवा मक्यासारखे पिके असतात त्यांना बऱ्याचदा पाण्याची टंचाई बसण्याची शक्यता असते व त्याकरिता राज्यातील ज्या ज्या काही धरणांच्या क्षेत्रातील शेतीक्षेत्र आहे त्याकरिता कालव्यांच्या पाण्याचे आवर्तन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो.
त्यामुळे योग्य वेळेला अशा प्रकारचे पाणी शेतीसाठी उपलब्ध होणे खूप गरजेचे असते. याप्रमाणे जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कुकडी डावा कालव्याचा विचार केला तर पारनेर तालुक्यातील हा कालवा जवळपास 20 ते 25 गावांसाठी खूप वरदान असून या परिसरातील गावातील पिण्याच्या पाण्याची आणि शेती सिंचनासाठी आवश्यक पाण्याची गरज भागवतो.
सध्या जर आपण पारनेर तालुक्याचा विचार केला तर या ठिकाणी कुकडी डावा कालवा परिसरामध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे व त्यामुळे कुकडी डावा कालव्याला दहा डिसेंबरपर्यंत शेती सिंचनासाठी पाणी सोडणार असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून देण्यात आली असल्यामुळे नक्कीच आता या भागातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच घेतली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड इत्यादींचा समावेश होता.
कुकडीला सुटणार दहा डिसेंबरपर्यंत सिंचनासाठी पाणी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुकडी डावा कालव्याला दहा डिसेंबर पर्यंत शेती सिंचनासाठी पाणी सोडणार असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते यांनी दिली असून सध्या पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालवा परिसरातील गावात पाण्याची टंचाई जाणवू लागल्याच्या पार्श्वभूमीवर ही बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
त्यामुळे येत्या 10 डिसेंबरपर्यंत कुकडी डावा कालव्याला पाणी सोडण्याचे प्रयत्न चालू आहेत व याकरिता माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली.पारनेर तालुक्याचा विचार केला तर या ठिकाणी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे
आणि गाईंची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्याने दूध उत्पादक शेतकरी व त्यासोबतच कांदा उत्पादक शेतकरी यांनी कुकडी डावा कालव्याला पाणी सोडण्यासाठी आमदार दाते यांना मागणी केली होती व त्याबाबत चर्चा देखील झाली होती.
या पार्श्वभूमीवर आमदार काशिनाथ दाते यांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली व यावेळी वळसे पाटील यांनी लगेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत याबाबत कुकडीला दहापर्यंत पाणी सोडण्याच्या सूचना केल्यावर अधिकाऱ्यांनी ही सूचना मान्य करीत 10 डिसेंबर पर्यंत पाणी सोडणार असल्याचे सांगितले.
पारनेर मधील 20 ते 25 गावे आहेत डाव्या कालव्यावर अवलंबून
कुकडी डावा कालवा पट्ट्यामध्ये पारनेर तालुक्यातील 20 ते 25 गावांचा समावेश होतो व जवळपास हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येत आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव भागात धरणे असल्याने पाणी हे पुणे जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात येते. त्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधींना त्यांच्यावर अवलंबून राहावे लागते.
त्यामुळे आमदार काशिनाथ दाते व आंबेगावचे आमदार दिलीप वळसे यांचा समन्वय चांगला आहे व त्यामुळे पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडणार नाही असा विश्वास जनतेला आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय देखील फायद्याचा ठरणार आहे.