Ahmednagar News : कर्जत तालुक्यात सध्या कुकडीच्या ओव्हरफ्लोचे आवर्तन सुरू असून, या सुरू असलेल्या आवर्तनातून भोसा खिंडीद्वारे निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मिरजगाव गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश काका गोरखे यांनी केली आहे.
यंदा सुरुवातीलाच पावसाने या भागात हुलकावणी दिल्याने येथील परिस्थिती भयावह बनली असून, पाण्याअभावी | नगदी पिके वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात आल्यास परिसरामधील पिकांना या पाण्यामुळे नक्कीच जीवदान मिळेल तसेच परिसरातील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.
यंदाच्या वर्षी पावसाळा सुरू होऊन ऑगस्ट उजाडला तरीदेखील या भागात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. त्यातच सीना धरणाने पाण्याचा तळ गाठला आहे.
आणखीन काही दिवस पाऊस नाही आल्यास खरीप हंगामातील उडीद, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, कपाशी, कडवळ आदी पिके तसेच फळबागा पाण्याअभावी वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता येथील जनतेमधून कुकडी आवर्तनातून सीना धरणात पाणी सोडण्याबाबत मागणीचा रेटा जोर धरू लागला आहे. येथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या कुकडी ओव्हरफ्लोच्या आवर्तनातून तत्काळ सीना धरणात पाणी सोडण्यात यावे, असे गोरखे यांनी सांगितले आहे.