Ahilyanagar News:- या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांचेच वर्चस्व दिसून आले व त्यांनी ते दाखवून देखील दिले. मागच्या पंचवार्षिक निवडणुकांचा निकालाचा जर संदर्भ बघितला तर राहुरीकरांनी नेहमीच प्रत्येक आमदाराला दोन टर्म संधी दिली आहे
व त्यातच आता आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये विकासाची अनेक कामे करून मतदारांची मने जिंकली असून त्यामुळे आता राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये तुतारीचा निनादच होणार असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाफना यांनी व्यक्त केले.
काय म्हटले सुरेश बाफना?
त्यांनी पुढे म्हटले की सोमवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असून सांगता सभेद्वारे आमदार तनपुरे हे जनतेपुढे केलेल्या विकास कामांचा अनेक तसेच आगामी काळातील विजन मांडणार आहेत. परंतु राहुरीच्या राजकीय इतिहासाची काही पाने जर आपण चाळली तर लक्षात येते की राहुरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सन 1999 व 2004 असे सलग दोनदा माजी आमदार चंद्रशेखर कदम यांना संधी दिली होती.
परंतु त्यानंतर मात्र 2009 ते 2014 पर्यंत सलग दोनदा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना संधी दिली. त्यानंतर मात्र 2019 ला आमदार प्राजक्ता तनपुरे यांना आमदारकी दिली व त्यांना ही संधी मिळवून दिली.
महाविकास आघाडी शासनाने आमदार तनपुरे यांना नामदार करीत सहा खात्यांचे राज्यमंत्रीपद दिले होते व त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील पाच वर्षात केलेली कामे त्यांना दुसऱ्या टर्म मध्ये देखील आमदारकीचे संधी देऊन जनता इतिहासाची पुनरावृत्ती करतील असा दावा देखील बाफना यांनी केला आहे.
तसेच आमदार तनपुरे यांनी दोन टर्म आमदार राहिलेल्या शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला व राज्यमंत्री म्हणून अडीच वर्षे काम करताना महावितरण मार्फत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या.
400 पेक्षा जास्त वीज रोहित्र व दहा वीज सबस्टेशन निर्मितीनंतर रस्त्यांचे प्रश्न तसेच शाळा, आरोग्याच्या सुविधा, जनतेच्या विकास कामांसाठी गावागावांमध्ये निधी पोहोचवण्याचं काम देखील त्यांनी केले. 2019 नंतर खऱ्या अर्थाने आमदार तनपुरे यांचे कार्य जनतेला दिसले.
कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण होऊन केवळ राहुरीतच नाही तर नगर व पाथर्डी परिसरात देखील त्यांची मोठी क्रेझ वाढली असल्याचे देखील त्यांनी म्हटले. तनपुरे कुटुंबीयांनी मतदार संघाशी आपली नाळ जोडताना सुसंस्कृत तसेच उच्चशिक्षित पणा जोपासताना कधीच कोणाचे मन दुखावले नाही.
यामुळेच राहुरी मतदारसंघाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊन आमदार तनपुरे यांचा विजय हा अटळ असल्याचे देखील त्यांनी म्हटले व आमदार तनपुरे यांच्या रूपाने राहुरी मतदारसंघाला आमदार नव्हे तर कॅबिनेट मंत्री लाभणार असल्याचा दावा देखील यानिमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाफना यांनी केला आहे.