हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पहाटे पहाटे दाट धुके पडायला सुरुवात झाली आहे. हे चित्र रविवारी सकाळी प्रवरा परिसरातील अनेक भागात पाहावयास मिळाले.राहाता तालुक्यातील प्रवरा परिसरात रविवारी पहाटे धुक्याने पूर्ण परिसर व्यापून गेला होता.
या धुक्यामुळे प्रवरा परिसरातील श्रीरामपूर रोड, लोणी रोड, नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्ग यांसह अनेक गावांमध्ये पूर्ण धुकेमय वातावरण होते. पहाटे उठणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना हे धुके स्पष्ट दिसले.
धुक्यातून कशीबशी वाट काढताना नागरिकांसह रोडवरून जाणाऱ्या चार चाकी वाहनधारकांना आपल्या गाडीचे लाईट लावून जावे लागत होते, तर काही चारचाकी वाहनांनी आपल्या गाड्या रोडच्या कडेला लावून थांबणे पसंत केले होते.
रविवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत धुके असल्यामुळे अनेकांना या धुक्यामुळे आपले दैनंदिन कामकाज करता आले नाही. सकाळी नऊनंतर थोड्याफार प्रमाणात धुके मावळल्यावर अनेकांनी आपापल्या कामाला सुरुवात केली.
एकूणच गेल्या आठ दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात गारवा तयार झाला असला तरी पाऊस कधी पडेल हे मात्र सांगता येत नाही.
या दाट पडलेल्या धुक्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण दिसन येत असून हरभरा गहू कांदे अशा पिकावर या धुक्यामुळे रोगराई होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या तरी चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.