Maharashtra Railway News : रेल्वे हे भारतातील प्रवासासाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून भारताच्या दळणवळण व्यवस्थेत रेल्वेची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. मात्र रेल्वेचा खरा विस्तार हा स्वातंत्र्यानंतरच झाला आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या सुविधेसाठी रेल्वेची पायाभरणी केली आणि स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने रेल्वेचे जाळे संपूर्ण देशात पसरवले आहे.
भारतातील जवळपास प्रत्येकच महत्त्वाच्या शहरांमध्ये रेल्वे स्थानक तयार झाले आहे. अहमदनगरमध्ये देखील स्वातंत्र्याच्या पूर्वीच रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली आहे. दरम्यान या रेल्वे स्थानकाचा गेल्यावर्षी रेल्वे स्थानक ते जंक्शन असा प्रवास पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे आता या रेल्वे स्थानकातून लवकरच दुहेरी मार्गावरून रेल्वे धावणार आहे. खरे तर गेल्या आठ वर्षांपासून मनमाड ते दौंड असे रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान हे दुहेरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदे या तालुक्यातील रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. विशेष म्हणजे विद्युतीकरणाचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे येत्या दोन वर्षात दुहेरीकरणाचे काम पूर्ण होऊन या रेल्वे मार्गावर प्रत्यक्षात रेल्वे धावू शकणार आहे.
परिणामी प्रवाशांच्या प्रवासाच्या कालावधीत मोठी बचत होईल आणि त्यांचा प्रवास आरामदायी होईल अशी आशा व्यक्त होत आहे. खरंतर सध्या स्थितीला एकेरी मार्गामुळे अनेकदा समोरून येणाऱ्या रेल्वेला थांबावे लागत होते. मात्र आता ही समस्या भेडसावणार नसून यामुळे रेल्वेचा प्रवास जलद होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, अहमदनगर, श्रीगोंदे या तालुक्यातून हा रेल्वे मार्ग जातो. दौंड-मनमाड या रेल्वे मार्गाचा १९७ किलोमीटरचा भाग हा अहमदनगर जिल्ह्यातून जात आहे.
हा एकेरी मार्ग १८७८ ला कार्यान्वित झाला होता. म्हणजेच हा रेल्वे मार्ग स्वातंत्र्याच्या पूर्वीच तयार झाला होता. दरम्यान अहमदनगर या मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. खरंतर या रेल्वे मार्गाचे बरेचसे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत झाले आहे.
या मार्गाचे अर्धे काम अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यातील मजुरांनी केले होते. दरम्यान आता या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे आणि विद्युतीकरणाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होणार आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार अशी आशा आहे.