Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वळणमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे कुत्रे रस्त्यावर, चौका चौकात टोळक्याने बसलेली असतात. अचानकपणे लहान मुले, महिला, पुरुषावर हल्ला करून त्यांना चावतात.
गेल्या महिनाभरात १० ते १२ व्यक्तींना या कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेकांना दुखापत झाली. दवाखान्यात पैसे घालण्याची वेळ आली आहे. या कुत्र्यांची धास्ती अनेकांनी घेतली असून संबंधिताने तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
राहुरी तालुक्यातील वळण गावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. हे कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला चढवून चावा घेत आहेत. चौका चौकात व आजूबाजूला बसलेली हे कुत्रे अचानक रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मुले महिला व पुरुषांना चावा घेत आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरातील खळवाडी व गावठाण परिसरात असलेल्या या कुत्र्यांनी तर दहा ते बारा जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. खळवाडी परिसरात असलेल्या एका कुत्रीने तर अनेकांना चावा घेऊन जखमी केले असल्याचे परिसरातील ग्रामस्थ सांगतात.
संबंधितांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बापूसाहेब काळे, श्याम डमाळे, ज्ञानदेव फुनगे, लक्ष्मण डमाळे, दादा ठोंबरे, आदिनाथ गडाख, रावसाहेब काळे, राधेश्याम काळे, राम डमाळे, अलका शिर्के, इंदुबाई डमाळे, शकुंतला दळवी, शुभम रणसिंग आदींनी केली आहे.
या कुत्र्यांनी एका अपंग व्यक्तीवरही हल्ला चढवत त्याला दोन-तीन ठिकाणी चावा घेतलेला आहे. कुत्र्यांनी चावा घेतलेल्यांपैकी अनेक व्यक्ती या मोलमजुरी करणाऱ्या असल्याने त्यांना काम बुडून दवाखान्यात कमावलेला पैसा घालावा लागत असल्यामुळे चीड व्यक्त होत आहे.
वळण व परिसरात अचानक मोठ्या संख्येने कुत्रे येतात. कुठून याबाबतही ग्रामस्थांमध्ये उलट सुलट चर्चा असून याबाबत अनेकांनी शिर्डी सारख्या ठिकाणाहून ही कुत्रे परिसरात आणून सोडले जात असल्याची शंका व्यक्त केली आहे.