Ahmednagar News : बदल्या झालेल्या अनेक पोलीस अंमलदारांना अद्यापही बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले नाही. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी तीन दिवसाचा अल्टिमेंटम देवून कर्मचारी अद्याप त्याच पोलीस ठाण्यात आहेत.
त्यांना संबंधित प्रभारी अधिकारी यांनी कार्यमुक्त केले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची पोलीस वर्तुळात चर्चा रंगलीये. आता पोलीस महानिरीक्षक याबाबत काय निर्णय घेतात याकडे पोलीस कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एप्रिल-मे महिन्यांत जिल्ह्यातील सर्व पोलीस अंमलदारांना तात्काळ बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. बदली आदेश होऊन सात महिने उलटले.
तरीही काही पोलीस ठाण्यातील अनेक अंमलदार आजही त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यांना प्रभारी अधिकार्यांकडून कार्यमुक्त केले जात नसल्याची जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला प्रभारी अधिकार्यांनी सात महिने केराची टोपली दाखवली.
नुकत्याच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पुन्हा बदल्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून दस्तुरखुद्द नाशिक परिक्षत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांच्या कोर्टत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यांनी पोलीस अंमलदार यांच्या समस्या अस्थेने जाणून घेतल्या.
त्यावेळी एका महिला पोलीस अंमलदारांनी बदली झालेल्या काही पोलीस अंमलदारांना अद्यापही कार्यमुक्त करण्यात आले नसल्याची तक्रार केली. त्यांना कार्यमुक्त केले जात नसल्याची खंत व्यक्त केली.
त्या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शेखर पाटील यांनी बैठकीत बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना बदली ठिकाणी कार्यमुक्त का केले नाही, वारंवार सांगून देखील त्यांना कार्यमुक्त केले जात नसल्याने प्रभारी अधिकार्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
तर पुढील तीन दिवसांत बदल्या झालेल्या अंमलदरांना बदली ठिकाणी कार्यमुक्त करा, तसे केले नाही तर तुम्हालाच नियंत्रण कक्षात आणतो, असा इशाराच डॉ.शेखर पाटील यांनी संबंधीत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना दिला.
मात्र आज पाच दिवस उलटून ही काही कर्मचार्यांना अद्याप कार्यमुक्त केले नसल्याने पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली का? असा अशी चर्चा पोलीस वर्तुळात जोरदार सुरु आहे. त्यामुळे पोलीस महानिरीक्षक याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.