Ahmednagar News : सध्याचा तरुण वर्ग नोकरीच्या मागे धावताना दिसतो. अनेकांना मनासारखी नोकरीही मिळत नाही. अनेक तरुण अगदी थोड्या पैशांत नोकरी करतात व त्यातच समाधान मानतात. परंतु हाच तरुण वर्ग शेतीकडे वळत नाही.
त्याचे कारणही तसेच आहे. अनेक तरुण म्हणतात की पाऊस, पाणी याची शाश्वती नाही. तसेच लहरी हवामान आहे त्यामुळे शेती परवडत नाही. परंतु तसे जर पाहिले तर आधुनिकतेची कास शेतीला जोडली व थोडीशी टेक्निक वापरली तर काहीही अश्यक्य नाही हे नगरच्या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.
या शेतकऱ्याने एक एकरात हिरव्या मिरचीचे पीक घेतले आहे. आता ती मिरची थेट ब्रिटनबरोबरच युरोपियन देशात निर्यात होत आहे. हा शेतकरी कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील असून त्यांचे नाव आहे आनंद मालकर.
तेच ते पीक घेण्यापेक्षा शेतात असे पीक घ्यावे की, त्यातून चांगले उत्पादन मिळेल, असे मनाशी निश्चित करून एक एकरात हिरव्या मिरचीचे पीक घेतले आहे. आनंद मालकर यांनी शेताची पूर्व मशागत करून शेतात एका एकरात पाच ट्रॉली शेणखत टाकले.
शेतात ४.२५ फुटांवर समांतर वरंबा करून त्यात तीन गोण्या निंबोळी पेंड व ३ गोण्या डीएपी खत मिसळून दिले. त्याच अंतरावर ठिबक पसरविले व त्यावर मल्चिंग पेपर टाकून दीड फूट अंतरावर शार्क वन जातीची ७,५०० रोपे याच वर्षी २८ जानेवारी रोजी रोपविली.
मागील पंधरा दिवसांपासून तोड सुरू झाली आहे. नव्वद दिवसांत दोन टन उत्पादन निघाले आहे. अजून सहा महिने उत्पादन सुरू राहणार असून, दहा ते बारा टन उत्पादन निघण्याचा अंदाज मालकर यांनी व्यक्त केला.
सदरची निर्यातक्षम मिरची बनविण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा लागतो असेही ते म्हणाले. उन्हाचा, तसेच मव्याचा अटकाव करण्यासाठी शेताच्या चौहू बाजूने शेडनेटचा वापर केला आहे.
मिरची ही सध्या युरोपियन देशात निर्यात होत असून भावही समाधानकारक मिळत आहे.