अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रमाणित झालेल्या मानसिक आरोग्यावरील अद्ययावत माहितीचे संकलन असलेली मानसिक आरोग्य मार्गदर्शिका उद्या अण्णा हजारे यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशित होत आहे.
सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात आयोजिण्यात आलेल्या 28 व्या श्रमसंस्कार छावणीत सकाळी 11 वाजता या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. हा समारंभ सर्वांसाठी खुला आहे.
कुटुंबात मनोरुग्ण असलेले परीवार,मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्ते, या विषयाचे अभ्यासक त्यांच्यासारखी मानसिक आरोग्य वरील सर्व माहिती प्रथमच सुलभ मराठीत प्रसिद्ध होत आहे.
जिनेवा ( स्वित्झर्लंड) येथे जागतिक आरोग्य संघटनेसोबत 22 वर्षे विविध स्वरूपाचे स्वयंसेवी कार्य करणाऱ्या सौ.सीमा मुकुंद उपळेकर यांनी या पुस्तिकेचे मराठी रुपांतरण केले आहे.
मानसिक आरोग्यासाठी केलेल्या कामाबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. भरत वटवानी यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. सौ उपळेकर यादेखील प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
200 पृष्ठांच्या , अे4 आकाराच्या या मार्गदर्शक पुस्तकाच्या 5 हजार प्रती स्नेहालय संस्थेच्या स्नेहश्रद्धा मनोयात्री उपचार आणि पुनर्वसन प्रकल्पाने काढल्या आहेत.
ही सर्व माहिती आणि मार्गदर्शक पुस्तिकेचे मोफत वितरण केले जाणार असल्याचे स्नेहश्रद्धा प्रकल्प संचालिका सौ दिप्ती नीरज करंदीकर आणि सुलक्षणा आहेर यांनी सांगितले.