Ahilyanagar Poitics:- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा जागा वाटपामध्ये आणि उमेदवारी निश्चितीमध्ये चर्चेचा मतदार संघ या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ठरला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर आपण बघितले तर या ठिकाणी विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेसचे तिकीट मिळेल व त्यांची उमेदवारी ही फिक्स मानली जात होती.
परंतु काँग्रेसच्या माध्यमातून लहू कानडे यांना डावलून हेमंत ओगले यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली व त्यानंतर मात्र लहू कानडे यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश करत अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवली. तसेच श्रीरामपूर मतदारसंघांमध्ये शिंदेसेनेकडून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती.
परंतु लहू कानडे यांना काँग्रेसने उमेदवारी न दिल्यामुळे ते अजित पवार गटात प्रवेश करत त्यांनी तिथून उमेदवारी मिळवली व दोन्ही उमेदवारांकडून प्रचार सुरू करण्यात आला होता. पण नेमका श्रीरामपूर मतदारसंघांमधून महायुतीचा अधिकृत उमेदवार लहू कानडे की भाऊसाहेब कांबळे? याबाबत खूप मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
परंतु नंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत लहू कानडे यांनी मेळावा घेतला व जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते व यावेळी विखे पाटलांनी भाऊसाहेब कांबळे यांनी आपली फसवणूक केली असून त्यांनी नाव व फोटोचा वापर करू नये असे जाहीरपणे सांगितले होते. परंतु तरीदेखील भाऊसाहेब कांबळे यांच्याकडून त्यांचे नाव व फोटोचा वापर केला जात होता. याच मुद्द्यावर शनिवारी विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
काय म्हटले आहे तक्रारीत?
मंत्री विखे पाटील यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भाऊसाहेब कांबळे हे माझे नाव व फोटो निवडणूक प्रचारासाठी वापरत आहेत. त्यांनी अशा प्रकारचे पोस्टर व बॅनर छापून मतदारसंघातील गावांमध्ये लावले आहेत. याकरिता भाऊसाहेब कांबळे यांनी कोणतीही लेखी अथवा तोंडी परवानगी घेतलेली नाही.
त्यांच्या उमेदवारीला कोणत्याही प्रकारचे संमती व समर्थन नाही. त्यांचे हे कृत्य बेकायदेशीर असून विनापरवानगी वापरलेले नाव व फोटोद्वारे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. अशा पद्धतीची लेखी तक्रार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.