Ahmednagar News : करंजी पाथर्डी व नगर तालुक्यातील २३ गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिरी – तिसगाव प्रादेशिक नळयोजनेचे पाच कोटी रुपये वीजबिल थकल्याने महावितरणन कंपनीने योजनेचा वीजपुरवठा बंद केल्याने ही योजना बंद पडली आहे, त्यामुळे लाभधारक २३ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुळा धरणातून मिरी- तिसगाव प्रादेशिक नळयोजनेद्वारे नगर तालुक्यातील व पाथर्डी तालुक्यातील २३ गावांना पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा केला जातो. यासाठी पांढरीचापूल,
या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलेले असून, येथून पाणी फिल्टर करून ते नगर तालुक्यातील चार तर पाथर्डी तालुक्यातील १९ गावांना या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे प्रत्येक गावालाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे, त्यामुळे बहुतांश गावांची तहान भागवण्याचे काम मिरी- तिसगाव नळयोजनेद्वारे केले जात आहे.
सध्या १४ ते १५ गावे या योजनेचे पाणी घेत आहेत; परंतु ज्या गावांना मिरी – तिसगाव नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापैकी अनेक गावे या योजनेचे पाणीपट्टी भरण्यास धजावत नसल्यामुळे या योजनेच्या वीजबिलाचा आकडा मोठा वाढला आहे.
वीजबिलाचा आकडा लक्षात घेता आठ दिवसांपासून या योजनेचा वीजपुरवठा बंद केल्याने लाभधारक गावांचा पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा देखील यामुळे बंद झाला आहे.
पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे अनेक लाभधारक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, मिरी तिसगाव नळयोजना वीज कनेक्शन जोडून पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी लाभधारक गावांमधून केली जात आहे.
मिरी- तिसगाव नळयोजनेचे दर महिन्याला चार साडेचार लाख रुपये बिल येते. प्रत्येक महिन्याचे बिल भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेले आहे. बिल भरण्यास विलंब झाल्याने महावितरणने आठ दिवसांपासून या योजनेचा वीजपुरवठा बंद केलेला आहे,
त्यामुळे प्रत्येक लाभधारक गावाने पाणीपट्टी नियमितपणे भरावी, जेणेकरून ही योजना बंद पडणार नाही. भाऊसाहेब सावंत, सचिव मिरी – तिसगाव प्रादेशिक नळयोजना.