महिला सरपंचासोबत गैरवर्तन करण्याचा व तिच्या पतीसह दोघांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. गुरूवारी (दि. १८) सकाळी पावणे बाराच्या सुमारास नगर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. शाळेच्या आवारात थांबण्यास विरोध केल्याच्या रागातून तरुणाने हे कृत्य केले.
या मारहाणीत महिलेचे पती, दीर व चुलत दीर जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे दीर व चुलत दीर यांना दगड व विटाने मारहाण केली आहे. याप्रकरणी पीडित महिला सरपंच यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अविष्कार जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरूवारी सकाळी अविष्कार हा गावातील शाळेच्या परिसरात होता. तेव्हा फिर्यादीचे पती त्याला म्हणाले, ‘तुझ्या मुळे शाळेचे नाव खराब होते, मुला-मुलींना त्रास होतो. पुतण्याला घेऊन फिरतो म्हणून शाळेचे नुकसान होते. पुतण्याला घेऊन फिरू नको, शाळेच्या आवारात थांबू नको’, असे सांगितले. याचा अविष्कार याला राग आला. त्याने फिर्यादीसोबत हुज्जत घालून त्यांच्याशी गैरवर्तन केले.
फिर्यादीच्या पतीला मारहाण केली. दीर व चुलत दीर यांना दगड, विटाने मारहाण करून जखमी केले आहे. असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.