अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- वृद्धेश्वर कारखान्यासह जिल्हा बँकेचे संचालकपद बिनविरोध मिळवून आमदार मोनिका राजळे यांनी तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर पुन्हा एकदा अबाधित वर्चस्व सिद्ध केले.
आगामी सर्व निवडणुकांत सर्व कार्यकर्ते मिळून राजळेंच्या नेतृत्वाची परंपरा चालवतील, असा विश्वास भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी व्यक्त केला.
जिल्हा बँकेच्या संचालक पदावर आमदार राजळे यांची बिनविरोध निवड झाल्यावर त्यांचे निवासस्थानी स्थानिक भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आदींच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील पदाधिकारी अनेक कार्यकर्त्यांनी भेट देऊन आमदार राजळे यांचा गौरव केला. लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठान, कसबापेठ मानाचा गणपती मंडळ आदींच्या वतीने डाॅ. श्रीधर देशमुख यांनी आमदार राजळे यांचा पुस्तक भेट, प्रसाद व महावस्त्र देऊन गौरव केला.
खेडकर म्हणाले, आमदार राजळे यांचे नेतृत्वाखाली पाथर्डी-शेवगाव तालुक्यात पक्षाची विजयी घोडदौड सुरू आहे. प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या धोरणामुळे कार्यकर्ते पक्षाबरोबर जोडली जात आहेत.
आमदार राजळे यांच्या सलग विजयाने कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास व उत्साह वाढला असून आगामी सर्व निवडणुकांत असेच चित्र तालुक्यात दिसेल, असे खेडकर म्हणाले. अजय भंडारी यांनी आभार मानले.