अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-निवडणूक ही लोकशाही मार्गाने झाली पाहिजे, येथे कोणाची दादागिरी खपवून घेणार नाही.
आमच्या कार्यकर्त्यांना कोणी अरेरावीची भाषा वापरली तर माझ्यासारखा सामाजिक गुंड कोणी नसेल असे खडे बोल आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना (माजी पालकमंत्री राम शिंदे यांचे नाव घेता) सुनावले.
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत विरोधकांच्या ताब्यातून आमच्या ताब्यात द्या, विकास काय असतो हे पुढील काळात दाखवून देईल., असेही ते म्हणाले.
ते खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ग्रामपंचायतच्या माध्यमातून येथून पुढे आपणाला खर्ड्याचा कायमचा पाणी प्रश्न सोडवायचा आहे.
खर्डा किल्ल्याचे काम बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी भव्य व्यापारी संकुल उभे करून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. येथून जाणाऱ्या पालखी मार्गाचे काम पुढील काळात पूर्ण होणार आहे.
संत सीताराम गड, संत गीते बाबा गडाचे महत्त्वपूर्ण काम आपण करणार आहोत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील रस्ते, गटार, फिल्टरचे पाणी इत्यादी कामे आगामी काळात करणार आहोत.
त्यामुळे विरोधकांच्या ताब्यात असणारी खर्डा ग्रामपंचायत आमच्या विचारांच्या माणसांकडे द्या. असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.