अहमदनगर बातम्या

आमदारकी लढवणारच ! घुले पाटलांनी दंड थोपटले, भाजपात जाऊन राजळेंनाच शह देणार? दोन्ही पवारांपैकी एकाची नाराजी ओढवणार? शेवगावची राजकीय गणिते बदलाच्या वाटेवर..

लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्यात, त्या झाल्या की लगेच लागणार विधानसभा. लोकसभेपेक्षा विधानसभेला इच्छुकांची भाऊगर्दी वाढलेली दिसते. अहमदनगर जिल्ह्यातही परिस्थिती वेगळी नाही. यावेळी भाजपच्या केंद्रातील व राज्यातील वाढत्या पॉवरमुळे अहमदनगरमधील राजकीय गणिते काही वेगळी असतील यात शंका नाही.

सध्या चर्चा आहे शेवगाव मतदार संघाची. आ. मोनिका राजळे या मतदार संघातील स्टँडिंग भाजप आमदार आहेत. परंतु या मतदार संघात आणखी एक राजकीय प्रस्थ आहे ते म्हणजे घुले पाटील. माजी आ. चंद्रशेखर घुले हे पहिल्यापासून राष्ट्रवादीचे. परंतु राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर मात्र त्यांनी दोन्ही पवारांकडे जाण्याचे टाळले आहे. त्यांनी अजूनही कोणत्या गटात आहोत याची जाहीर भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु आता मात्र त्यांनी एका कार्यक्रमात यंदा आमदारकी लढवायचीच असा निश्चयच केला आहे.

आमदारकीसाठी दंड थोपटले :- माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी घुले कुटुंबातील उमेदवार विधानसभेला उतरणारच असे जाहीर भाष्य केले आहे. शेवगाव येथे युवक निर्धार परिवर्तन मेळावा व बुथकमिटी शिबिर बूथ कमिटीची स्थापन करण्यासाठी बैठक झाली होती.

त्यात त्यांनी हा निर्धार बोलून दाखवला. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, पक्षाची वाट न पाहता घुले हाच पक्ष समजून सर्वानी तयारीला लागायचे आहे. वेळप्रसंगी कोणताही पक्ष असो, संघटना असो निवडणूक रिंगणात घुले कुटुंबातील उमेदवार उतरणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

आता थांबायचे नाही, निवडणुका कोणत्याही परिस्थिती लढविण्यासाठी एकजुटीने कामाला लागायचे, मतदार संघात युवकांची फळी भक्कमपने निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनच घुले यांनी यावेळी केले.

राजळेंना शह की पवारांची नाराजगी? :- घुले पाटील हे पवारांशी एकनिष्ठ. परंतु अद्याप ते कोणत्याही गटात गेले नाहीत. जर ते शरद पवारांसोबत गेले तर त्यांना आमदारकी मिळूही शकते. परंतु त्यांना अजित पवार यांची नाराजगी ओढून घ्यावी लागेल.

आता ही नाराजगी ओढवून घेणे हे त्यांच्यासाठी किती फायदेशीर होईल हे मात्र येणारा काळच सांगेल. पण जर ते अजित पवार गटात गेले तर त्यांना आमदारकी मिळेल यात शंका आहे. याचे कारण असे की अजित पवार गट भाजपसोबत आहे.

व ही जागा भाजपची असून येथे त्यांचा आ. मोनिका राजळे हे स्टँडिंग आमदार आहेत. त्यामुळे ही जागा त्यांना मिळेल यात शंका आहे. त्यात घुले पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत अशी चर्चा नागरिकांत आहे. जर तसे झाले व तेथे जाऊन त्यांनी आमदारकी मिळवली तर आ. मोनिका राजळे यांना शह बसेल यात शंका नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts