Ahmednagar News : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शाळा आणि महाविद्यालयांची झाडाझडती घेणार असून बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना न केलेल्या शाळा तात्काळ बंद पाडण्याचा इशारा राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला आहे.
बदलापूरचे प्रकरण दुर्दैवी असले तरी त्याला प्रशासकीय गोष्टी पण जबाबदार आहेत ही नाण्याची दुसरी बाजू देखील समजून घेतली पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयात पालक आपले पाल्य त्या प्रशासनाच्या विश्वासावर त्या ठिकाणी पाठवत असतात आणि त्याच ठिकाणी जर गैर कृत्याच्या निमित्ताने त्या पाल्याचं काही वाईट होत असेल तर ते थांबवण्याची तरी जबाबदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गेल्या आठवड्यात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाच्या आवारात, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा आणि शाळा महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षकेतर – कर्मचाऱ्यांचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र करून घेण्याबाबत याद्वारे सूचित करण्यात आले होते.
पण याबाबत उदासीनता दिसून येत आहे. आता सर्व शाळांनाच १६ सप्टेंबर पर्यंत वरील बाबींची पूर्तता करावी. अन्यथा १७ सप्टेंबर पासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या बाबत प्रत्येक शहर आणि तालुका निहाय ४ पथक तयार केले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी हे कार्य हाती घेतले जाणार आहे.
ते या सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्व्हे करणार आणि ज्या शाळा आणि महाविद्यालयात अशा प्रकारच्या त्रुटी आढळतील त्या शाळा ते ठिकाण तात्काळ बंद पाडण्यात येईल. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याच दिवशी सुट्टी जाहीर करून घरी पाठवण्यात येईल हे आंदोलन करण्यासाठी प्रशासनानेच मजबूर केलेले आहे.
कारण जे काम शासनाचा पगार घेऊन बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे ते काम जर आम्ही करत आहोत तर याला कुठेतरी प्रशासन जबाबदार आहे. आणि सर्व शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाला विनंती आहे की, कोणताही अनुचित प्रकार घडू देऊ नका. आमची तशी इच्छा देखील नाही पण आमच्या पाल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कधीही दुय्यम स्थानी ठेवणार नाही याची दखल घ्यावी, इशारा मनविसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला आहे.