Ahmednagar News : पुढील चार आठवडे मान्सून जोरदार सक्रिय राहणार आहे. आगामी चार आठवडे राज्यासाठी सुखद आहेत . त्याची सुरुवात २० जूनपासून सुरू झाली आहे. २१ जूनपासूनच मान्सून सक्रिय होण्यासाठी लागणारी स्थिती तयार झाली असून, राज्याच्या बहुतांशभागांत चांगला पाऊस होईल, असे चित्र आहे.
तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात अधिक गती घेणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिला आहे.
यंदा मान्सून वेळेवर येऊनही तो सतत अडखळत पुढे सरकल्याने महाराष्ट्र पार करून पुढे जाण्यास विलंब झाला. २० जून रोजी मान्सूनने गती घेतली. २१ रोजी तो मध्य प्रदेशसह बिहारमध्येही दाखल झाला, त्यामुळे आता ५० टक्के देश व्यापला आहे.
गेल्या वीस दिवसांपासून ईशान्य मान्सूनची शाखा पुढे सरकली नाही. त्या दोन्ही शाखा लवकरच एकत्र होऊन उत्तर भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
राज्याच्या बहुतांश भागांत मान्सूनने शुक्रवारी हजेरी लावली.
यात सर्वांत जास्त पाऊस माथेरान येथे १७२.६ मिमी इतका झाला. या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ ठाणे, बेलापूर भागात १०६.६ मि. मी.ची नोंद झाली.
मान्सून मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागांसह विदर्भाच्या उर्वरित भागांत पुढे सरकला. मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशात दाखल झाला. गंगेच्या पश्चिम बंगालचा काही भाग, उपहिमालयीन रांगा, झारखंडचा काही भाग त्याने व्यापला आहे. येत्या दोन दिवसांत मान्सूनचा पाऊस महाराष्ट्राला व्यापून पुढे सरकेल.
असा अंदाज व्यक्त केला असून पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आज काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.